Breaking News

चिखलात हरवला शारदानगरचा रस्ता, नागरिकांची दुरुस्तीची मागणी !

 चिखलात हरवला शारदानगरचा रस्ता, नागरिकांची दुरुस्तीची मागणी !


 कोपरगाव प्रतिनिधी – 
     कोपरगाव शहराच्या अनेक रस्त्यांची वाट लागली असून शारदानगर परिसरातील रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून सदरचा रस्ता चिखलात हरवला असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे.
                  कोपरगाव शहराच्या शारदानगरमधील रहिवासी दरवर्षी पावसाळ्यात महत्वाच्या असलेल्या खराब रस्त्यांमुळे त्रस्त होवून आपापसात संताप व्यक्त करीत असत. वारंवार कोपरगाव नगरपरिषदेकडे तक्रारी करूनही या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे शारदानगरमधील रहीवाशांनी पदरमोड करून या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहे. मात्र यावर्षी पावसाचा मूड वेगळाच असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात पडत असून व कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे यावर्षी नागरिक मुरुमासाठी खर्च करू शकत नाही. सदरचा रस्ता हा पूर्णपणे खराब झाल्यामुळे दुचाकीस्वार तारेवरची कसरत करत असून पायी चालणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे याचा विशेष त्रास जेष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होत आहे. 
      सुरु असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर नेहमीच सर्वत्र चिखल असल्यामुळे दुचाकीचे अर्धे चाक या चिखलात फसत असून सर्वत्र दलदल असल्यामुळे भविष्यात काही दुर्दैवी घटना घडू शकतात त्या घटनेची जबाबदारी कोपरगाव नगरपरिषद घेणार का? असा सवाल शारदानगरमधील रहीवाशांनी कोपरगाव नगरपरिषदेला केला आहे. कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी आणला असून या निधीतून शारदानगरच्या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी अपेक्षा या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या रहीवाशांनी व वाहनधारकांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केली असून तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा देण्यासाठी या रस्त्यावर त्वरित मुरुम टाकुन हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी शारदानगरमधील रहीवाशांनी कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे.