Breaking News

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात!

- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची रणनीती

- भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता


मुंबई/ विशेष प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील बडे नेतृत्व असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात चर्चा होऊन रणनीती आखण्यात आली. खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्याचेही निश्‍चित झाले असल्याचे विश्‍वासनीय सूत्राने सांगितले. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार असून, खडसेंसोबत भाजपचे किती आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार याबाबतदेखील पक्षाच्या गोपनीय बैठकीत चर्चा झाली. भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतर आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर इत्यादी नेते उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच खडसे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून देवकर आणि अनिल पाटील यांनी आपली भूमिका मांडली. खडसेंच्या नेतृत्वात काम करण्यात अडचण नाही, असे या दोघांनी सांगितल्याचे कळते. खडसे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील बदलणारी राजकीय गणिते आणि त्यातून राष्ट्रवादीला होणार्‍या फायद्या तोट्यावरही या बैठकीत चर्चा झाली. त्याशिवाय, खडसेंना पक्षात संघटनात्मक जबाबदारी द्यायची का? किंवा मंत्रिमंडळात समावेश करायचा यावरही या बैठकीत चर्चा झाली. तथापि, खडसे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिमंडळात सहभागी करून त्यांच्याकडे जबाबदारीचे खाते द्यावे, असा सूर याप्रसंगी नमूद झाला. उत्तर महाराष्ट्र भाजपमध्ये दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र भाजपात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. खडसे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यास राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रात मोठा फायदा होणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पक्ष विस्तारवेळी भाजपचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठीही राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. लवकरच शरद पवार व एकनाथ खडसे यांच्यात चर्चा होणार असल्याची माहितीही विश्‍वासनीय सूत्राने दिली. खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीत येणारे नेते व आमदार यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबतही या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याचे सांगण्यात आले.


खडसे दुसर्‍या पक्षात जाऊच शकत नाही : मुनगंटीवार

भाजप नेते एकनाथ खडसेंना दुसर्‍या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून दुसर्‍या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

-----------------