Breaking News

कंगणाचा प्रण, मराठ्यांचे रण !

 कंगणाचा प्रण,मराठ्यांचे रण!

मुख्यमंञी शिवसेनेचाच होणार अशी हाकाटी वास्तवात आणून काटेरी सिंहासनावर आरूढ झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या सुपुञाला खऱ्या अर्थाने  दुरून डोंगर साजरे या मराठी म्हणीचे प्रत्यंतर आले असणार.सत्तेचे सुख ऐहीकतेची उब देणारे असले तरी या सुखासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडतांना उदभवणाऱ्या अडचणी वेळीच ध्यानात घेतल्या नाही तर कोण संकट उभे ठाकू शकते याची धग उध्दव ठाकरेंइतकी आजवरच्या कुणाही मुख्यमंञ्यांना बसाली नसावी.मातोश्रीच्या अट्टाहासासोबत ज्यांनी सत्तेच्या सारीपाटावर कवड्यांची मांडणी करून शह काटशहाच्या खेळी केल्या त्या हितचिंतकांकडून वेळोवेळी होणाऱ्या  मार्गदर्शनाचा नेमका अर्थही उमगण्यात होणारी चुक या धगीची तिव्रता आणखी वाढवते.मुख्यमंञी म्हणून महाराष्ट्राला वेगळेपण दाखविण्याची संधी बाळासाहेबांच्या पुञाला आली खरी पण कोरोनाच्या आंगतूक संकटाने मोडता घातला.त्यात आता कंगणाने केलेला प्रण आणि मराठ्यांचे संभाव्य रण यातून उध्दव ठाकरेंची खरी कसोटी लागणार आहे.

सत्तेपुढे शहाणपण उजळून निघते असा बढेजाव मिरवला जात असल्याने राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाला सत्तेच्या विविध पदांवर बसण्याची लालसा असते.समाजकारणात जम बसल्यानंतर चोर पावलांनी राजकारणात प्रवेश केलेल्या  प्रत्येकाला हा मोह आवरणे शक्य होत नाही.ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करण्याचा संकल्प सोडलेल्या शिवसेनेलाही या मोहाला आवर घालता आला नाही.पक्षच नाही तर शिवसेनेला समाजकारणातून राजकारणात स्थिर स्थावर करणारी मातोश्रीही अपवाद ठरली नाही.
पहिल्या टप्यात सत्ता आली तेंव्हा सत्ता वरकरणी मातोश्रीच्या उंबऱ्याबाहेर वावरताना महाराष्ट्राला दिसली तरी सत्तेचा रिमोट माञ मातोश्रीतच होता.१९९५-१९९९ या साडेचार वर्षाच्या कालखंडानंतर तब्बल वीस वर्षांच्या अंतराने महाराष्ट्राच्या सत्तेवर दावा प्रस्थापीत करून मातोश्रीने मुख्यमंञीपद मिळवले.बऱ्याच कालखंडानंतर महाराष्ट्राला तळमळ असलेला,पोटतिडकीने निर्णय घेणारा मुख्यमंञी लाभला असे वाटत असतांना कोरोनाची माशी शिंकली आणि अपेक्षांना मुरड दोघांनाही घालावी लागली.मुख्यमंञी म्हणून उध्दव ठाकरेंच्या मनात असलेला महाराष्ट्राचा कारभार लाॕकडाऊन झाला.कोरोनाचा आहेर आवरण्यात सारे लक्ष आणि सरकारची उर्जा खर्ची पडत असताना सुशांतसिंग राजपूतचे भुत मानगुटीवर बसले.कंगणा प्रकरणाने तर उध्दव ठाकरे यांच्या प्रतिमेला कलंकीत काम एका बाजूला सुरू असताना कोरोनाला आवर घालण्याचे शिवधनुष्यही पेलायचे आव्हान उध्दव ठाकरे यांच्यासमोर आहे.विशेषतः मुंबई महापालिकेने कंगणा राणावतचे पाडलेले आॕफीस ही आणखी एक डोकेदुःखी वाढली आहे.या घटनेनंतर उध्दव ठाकरे यांचा पुन्हा एकेरी उल्लेख करीत कंगणाचे उध्दव तेरा घमेंड टुटेगा हे ट्वीट उध्दव ठाकरे यांच्यासारख्या संवेदनशील माणसासाठी मुख्यमंञी पदाच्या सुखाहून कितीतरी अधिक क्लेशदायक आहे.कंगणाचा उध्दव ठाकरे यांची घमेंड तोडण्याचा प्रण ताजा असताना मराठ्यांचे उभे राहणारे रण उध्दव ठाकरे यांच्यासाठी कसोटीचे ठरणार आहे.
आता उद्धव ठाकरे मुख्यमंञी म्हणून चक्रव्युहात अडकले किंबहूना अडकवले गेले आहेत.राजकीय अभिमन्यूच्या भुमिकेत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीच्या चौकसपणाचा अधिक कस लागणार आहे,यातून उध्दव ठाकरे स्वतः सही सलामत बाहेर पडतील याविषयी महाराष्ट्र निश्चिंत आहे.माञ या चक्रव्युहात अडकविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आतून बाहेरून हातभार लावला ते सध्या तरी विरंगूळा अनुभवीत आहेत.बारामती असो नाही तर सामना कार्यालय.विरोधी पक्षात बसलेले भाजपाचे चाणक्य असो नाहीतर मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतांना जाणीवपुर्वक उदासीनता दाखवणारे  महाअधियोक्ता अथवा उपसमितीचे अध्यक्ष असोत.मजा माञ घेत आहेत.