Breaking News

अखेर रिया चक्रवर्तीला अटक

रिया चक्रवर्ती

 - एनसीबीची कारवाई

- सुशांतला ड्रग्ज घातलेका? तपास सुरु

- इतर कलाकारही एनसीबीच्या रडारवर

मुंबई/ प्रतिनिधी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली गेली. त्यानंतर तिला ताब्यात घेतले गेले. 

मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 10 तास रियाची  चौकशी झाली. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच एनसीबीच्या अटकेत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचे शोविकने सांगितले होते. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असे सांगत होती. पण मंगळवारी सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसर्‍या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) चौकशी केली. मंगळवारी पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली.  इतकच नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणार्‍या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता एनसीबी ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे.

-------------