Breaking News

शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करणार !

 


नवी दिल्ली | 'कृषी विधेयक प्रकरणी राज्यसभा खासदारांच्या पाठिंब्यासाठी आज दिवसभर मी देखील अन्नत्याग करणार आहे', अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२२ सप्टेंबर) आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे. 'खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे निलंबन करण्यात आले. अशा पद्धतीने खासदारांचा मूलभूत अधिकार हिरावणे अयोग्य आहे. त्यामुळे, सदस्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मी देखील अन्नत्याग करणार', असे शरद पवारांनी जाहीर केले आहे.

मोदी सरकारच्या वादग्रस्त कृषी विधेयकाविरोधात रविवारी (२० सप्टेंबर) राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. मात्र, सदस्यांच्या चर्चेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आवाजी मतदानाने हे विधेयक सभागृहात घाईघाईने मंजूर करून घेण्यात आले. या प्रकाराबद्दल विरोधकांकडून अत्यंत तीव्रपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर राज्यसभेत झालेल्या या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ८ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. याच निर्णयाबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.