Breaking News

दिनेश कार्तिकने कोलकाताच्या विजयाचे श्रेय दिले 'या' खेळाडूला


 मुंबई । कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादला सात गडी राखून पराभूत केले. युवा फलंदाज शुबमन गिलचे नाबाद अर्धशतक आणि पॅट कमिन्सच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर हा केकेआरने विजय मिळवला.

             प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला चार विकेट गमावून142 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात केकेआरने दोन षटके शिल्लक असताना तीन विकेट गमावून 145 धावा केल्या. गिलने 62 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 70 तर मॉर्गनने 29 चेंडूत 42 धावा फटकावल्या. त्यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने शुबमन गिलचे कौतुक केले आहे.कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर दिनेश कार्तिकने सलामीवीर शुबमन गिलला या विजयाचे श्रेय देत सांगितले की, "आम्ही तरुणांना तयार करण्यास सक्षम आहोत. तरुण खेळाडूंनी चांगले काम केलेले पाहून आम्हाला आनंद झाला. गिलनेही कोणत्याही दबावात न जाता क्रिकेटमधील या प्रवासाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे."तो पुढे म्हणाला की, "तुम्हाला किती धावांचा पाठलाग करावा लागतो हे माहीत झाले तर खूप बरे होते. 

           आम्ही खरोखर कठोर परिश्रम घेत आहोत आणि आशा आहे की, आम्हाला निकाल मिळेल. आमच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत, मला वाटते की आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण जेव्हा मला पाहिजे, तेव्हा मी त्यांचा वापर करू शकतो."सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर फलंदाज सुनील नरेन खाते न उघडताच परतला. मात्र, यानंतर फलंदाजीस आलेल्या नितीश राणाने 11 चेंडूत 22 धावांचा स्फोटक डाव खेळला आणि शुबमन गिलबरोबर 37 धावांची भागीदारी केली. यानंतर ओएन मॉर्गन आणि शुबमन गिल यांच्यात 92 धावांची नाबाद भागीदारी झाली, ज्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा विजय झाला.