Breaking News

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन योजने साठी कपात केलेल्या रकमेचा हिशोब मिळेना !

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन योजने साठी कपात केलेल्या रकमेचा हिशोब मिळेना !
---------------
अधिकाऱ्यांच्या सही विना 15 वर्षाच्या हिशोबाच्या पावत्या पडल्या धूळखात - शिवाजी खांडेकर
--------------
अनेक कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला त्वरित हिशोब पावत्या मिळाव्यात मागणी.

पारनेर प्रतिनिधी-
 राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नोव्हेंबर 2005 पासून जुन्या निवृत्ती वेतन योजने ऐवजी नवीन  परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली. या योजनेच्याअंमलबजावणीस व कर्मचाऱ्यांच्या रकमांचा कपातीस मुळातच पाच वर्षे विलंब झाला. परंतु पाच वर्षानंतर सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करण्यात आली व मागील पाच वर्षाच्या कालावधीची  कपातदेखील दर महिन्याला एक महिना याप्रमाणे करण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांचे करोडो रुपये दर महिन्याला जमा होत गेले. परंतु वेतन पथकाच्या गलथान कारभारामुळे संबंधितांना दरवर्षाला हिशोबाच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. यावर अनेक वेळा निवेदने देण्यात आली आंदोलने करण्यात आली यापैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त देखील झाले. तरी देखील त्यांचा हिशोब त्यांना मिळालेला नाही. शेवटी मागील वर्षी हा विषय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेऊन संबंधित वेतन पथक कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्यांच्या हिशोबाचे रेकॉर्ड अध्यावत करून संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ हिशोबाच्या पावत्या देण्यात याव्यात असे आदेश काढण्यात आले. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांचे तालुकानिहाय शिबिर आयोजित करून वेतन पथक कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षाची ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली. यासाठी प्रत्येक शाळेतील संबंधित लिपिकांनी आपापल्या शाळेतील  संबंधित कर्मचाऱ्यांचे कपाती बद्दलचे सर्व रेकॉर्ड पुन्हा उपलब्ध करून देऊन लेखे अद्ययावत करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले अशी माहिती शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली . प्रत्येक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हिशोबाच्या पावत्या अद्यावत करून सहीसाठी  सहा महिन्यापूर्वी ठेवण्यात आल्या. परंतु गेल्या सहा महिन्यापासून वेतन पथक अधीक्षक यांना  सह्या करण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे संबंधित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या हिशोबाच्या पावत्या धूळ खात पडलेल्या आहेत. अनेक कर्मचारी वारंवार हिशोब विचारीत आहेत.  मागील पंधरा वर्षात आपली किती रक्कम जमा झाली व शासनाचा किती हिस्सा जमा झाला त्याचे व्याज किती मिळाले याच्या हिशोबाच्या पावत्या न मिळाल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची आता वर्ग होणाऱ्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्याची मानसिकताही राहिलेली नाही. यातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त देखील होत आहेत. तरीदेखील संबंधितांना याचे गांभीर्य नाही शेवटी उपसचिव चारुशीला चौधरी यांनी 3 सप्टेंबर 2020 रोजी पत्रक काढून संबंधितांना मागील पंधरा वर्षाच्या कपात केलेल्या रकमेच्या हिशोबाच्या पावत्या तात्काळ देण्यात याव्यात व 20 सप्टेंबर 2020 पर्यंत तसा अहवाल द्यावा अशा प्रकारचे आदेश मा. आयुक्त व मा. संचालक यांना काढण्यात आले आहेत. आता तरी सह्या होतील का व अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना तात्काळ हिशोब पावत्या मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सचिव शिवाजी खांडेकर, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, जिल्हा सचिव भानुदास दळवी यांनी केली आहे.

    या योजनेसाठी दरमहा वेतनातून १०% रक्कम कर्मचा-यांची कपात करण्यात येते व १४% रक्कम राज्य शासनाची जमा करण्याबाबत शासन आदेश आहे.  परंतू ही योजना प्रत्यक्षात २०१४ पासून सुरु झाली असून चालू महिना व थकित एक महिना अशी कपात करण्यात येते.कर्मचा-यांची कपात वेतनातून करण्यात येते परंतू शासनाची रक्कम जमा झाली का याचा हिशोब आजपावेतो कोणत्याही कर्मचा-यास मिळालेला नाही.  यातच या योजनेतील अनेक कर्मचारी मयत झालेले असून त्यांचे कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा हिशोब मिळाला नाही तसेच कोणतीही रक्कम मिळालेली नाही.  तरी सदर हिशोब पावत्या त्वरीत वितरित करण्यात याव्यात.
------------
गोवर्धन पांडुळे,
पुणे विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ