Breaking News

कोविडवर मात करण्यासाठी भेंडा येथे हॉस्पिटल सुरू, पन्नास डॉक्टरांच्या टीमने एकत्रित येऊन घेतला निर्णय !

 कोविडवर मात करण्यासाठी भेंडा येथे हॉस्पिटल सुरू, पन्नास  डॉक्टरांच्या टीमने एकत्रित येऊन घेतला निर्णय ! 

नेवासा तालुका प्रतिनिधी

नगर जिल्ह्यासह इतर बाहेरच्या ठिकाणी ही कोविड रुग्णांची बेड अभावी होणारी हेळसांड लक्षात घेता नेवासा तालुक्यातील जनतेसाठी तालुक्यातीलच चाळीस डॉक्टरांनी एकत्रित येऊन सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात भेंडा येथे सर्वसुविधासह सुसज्ज नेवासा तालुका डॉक्टर्स कोविड हॉस्पिटल या नावाने कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार पासून कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले.

   भेंडा येथील संत नागेबाबा भक्त निवास सद्या मोकळे असल्याने तेथे बेडसह मुबलक पाणी प्रसाधनगृह, ऑक्सिजन आदींची सुविधा करण्यात आली असून नेवासा तालुक्यातील रुग्णांची इतर ठिकाणी परवड व हेळसांड होऊ नये म्हणून या हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक असलेले नेवासाफाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख हदयरोग तज्ञ डाॅ.अविनाश काळे पाटील यांच्या संकल्पनेतून व नेवासा येथील डॉ.शंकरराव शिंदे, लक्ष्मी क्लिनिक व समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. करणसिंह घुले,डॉ.विजयकुमार मुळे,डाॅ.रविंद्र दरंदले, डाॅ.भारत मरकड, डॉ.संजय भदगले,डॉ.वाल्मिक तुवर, डॉ.किशोर लांडे, डॉ.संतोष ढवाण,डॉ.सचिन साळुंके, डॉ.प्रणव जोशी,डॉ.शिवराज गुंजाळ,डॉ.विनय छनाली, डॉ.शिवतेज दारुंटे यांच्यासह पंचेचाळीस डॉक्टरांना एकत्रित आणून कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत पुढाकार घेतला आहे.

नेवासा तालुक्यातील सुमारे पंचेचाळीस डॉक्टरांनी एकत्रित येऊन कोविड हॉस्पिटल उभारण्याचा हा निर्णय घेतला असून सुमारे पन्नास बेडसह व्हेंटिलेटर,ऑक्सिजन लाईन व इतर सुविधा येथे रहाणार आहे.शासनाचे दरपत्रक नुसार फी आकारली जाईल असा विचार करून हे हॉस्पिटल सुरू करण्यात येत असून नेवासा तालुक्यातील रुग्णांना कोरोनातून मुक्त करून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न आम्हा सर्व डॉक्टर मंडळींचा रहाणार असल्याचे मुख्य प्रवर्तक डॉ.अविनाश काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

   कोरोना बाबत सद्याची परिस्थिती सर्वत्र बिकट स्वरूपाची असून आतापर्यंत नगर       पुणे, औरंगाबाद व इतर ठिकाणची सर्व हॉस्पिटल बेड नसल्याने फुल्ल झाली आहे.पैसा असून ही कोविड रुग्णांना उपचार घेता येत नाही,कोविड रुग्णांना हालअपेष्टा सहन करत येणाऱ्या विविध समस्याना ही सामोरे जावे लागत आहे,बेड उपलब्ध नसल्याने तर काही ठिकाणी ऑक्सिजनची समस्या उदभवत असल्याने रुग्ण दगवतांना दिसत आहे. ही भयावह परिस्थिती लक्षात घेता नेवासा तालुक्यातील तज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येत नेवासा तालुक्यातील जनतेसाठी अल्पदरात परवडेल व उपचार होईल असे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला इतर सुविधांची पूर्तता करण्यासाठी सर्व डॉक्टरांनी प्रत्येकी एक लाखाची गुंतवणूक यासाठी केली असल्याचे डॉ.अविनाश काळे यांनी सांगितले.

भेंडे येथे सुरू होत असलेल्या नेवासा तालुका डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलमध्ये दहा बेड आय सी यू,तर पन्नास सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी तज्ञ डॉक्टरांची व्हिजिट ऑन ड्युटी चोवीस तास करण्यात येणार आहे.तर रुग्णांच्या सेवेसाठी वेलट्रेन नर्सिंग स्टाफ,

ए. सी.रूम,व्हेंटिलेटर्स,बायपॅप या सुविधां बरोबर आहार मार्गदर्शन,आयुर्वेदा चार्याची व्हिजिट व त्यांच्या मार्फत प्राणायाम व योगाचे धडे ही दिले जाणार आहे.रुग्णांच्या जेवणाची तर संशयित रुग्णांची ही वेगळी व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक डॉ.अविनाश काळे यांनी यावेळी झालेल्या उदघाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.

नेवासा तालुक्यासाठी संत नागेबाबा भक्त निवास हे अल्पशा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.अविनाश काळे व डॉ.शंकरराव शिंदे यांनी नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूबाळ काळे यांना धन्यवाद दिले.

भेंडे गावचे युवा नेते गणेश गव्हाणे म्हणाले की हॉस्पिटलच्या उभारणीने नेवासा तालुक्यातील जनतेला व रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून लागेल ती मदत आम्ही गावकरी या नात्याने हॉस्पिटलसाठी करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.

अव्वाच्या सव्वा पध्दतीने इतर ठिकाणी होणारी लूट थांबावी म्हणून हा निर्णय नेवासा तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्रित येऊन कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हॉस्पिटलचर प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ.करणसिंह घुले यांनी सांगितले.

नेवासा तालुक्यातील रुग्णांसाठी देवदूत बनून हॉस्पिटल सुरू करणाऱ्या डॉक्टर मंडळींचे जेष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी,नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर,पत्रकार ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या भाषणातून केले.सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर डॉ.विजयकुमार मुळे यांनी आभार मानले.