Breaking News

राहुरी तालुक्यात व्यापारी टाळेबंदीच्या विरोधात !

राहुरी तालुक्यात व्यापारी टाळेबंदीच्या विरोधात
------------------
कोरोना बाधीत रुग्ण निघाल्यास दोन्ही व्यापारी संघटनेकडून वैद्यकीय खर्च वसुल करावा 


देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
         राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने टाळेबंदीबाबत, व्यापारी व प्रशासन यांनी ८ दिवस टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला असताना.राहूरी फॅक्टरी येथील दोन्ही  व्यापारी संघटनानी टाळेबंदीला विरोध करून दुकाने सुरू ठेवली आहेत. तालुक्यात टाळेबंदी असल्याने शेजारील गावातील नागरीक खरेदीसाठी आल्याने  जर सर्वसामान्य नागरिकांना कोरोना बाधा  झाली तर त्यांचा खर्च दोन्ही व्यापारी संघटनेकडून वसूल करावा अशी मागणी तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांच्याकडे राहूरी फॅक्टरी येथील युवकांनी केली आहे.
            राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने साखळी तुटावी म्हणून  लोकप्रतिनिधी , व्यापारी व प्रशासन यांच्यात बैठक होऊन १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत तालुका टाळेबंदीचा निर्णय झाला. यास सर्व गावांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र त्याचेवेळी राहूरी फॅक्टरी येथील दोन व्यापारी संघटनांनी विरोध करून आम्ही दुकाने सुरू ठेवणार असा निर्णय घेतला.  
            गुरूवारी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरातील सर्व दुकाने सुरू होती. या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दीही पहावयास मिळाली. त्यामुळे राहूरी फॅक्टरी येथील संतप्त युवकांनी  राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांना निवेदन देऊन दोन्ही व्यापारी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतली.
            राहूरी फॅक्टरी लगतच्या राहूरी, कोल्हार, टाकळीमिया, श्रीरामपूर  येथे मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सापडत असल्याने तेथील बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे.परिणामी तेथील नागरीक खरेदीसाठी राहूरी फॅक्टरी व देवळाली प्रवरात येण्याची शक्यता असून त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. परिणामी  रूग्ण संख्यात वाढ होणार  असल्याने यास सर्वस्वी राहुरी फॅक्टरी येथील दोन्ही व्यापारी संघटना जबाबदार राहणार असून या संघटनांनी राहूरी फॅक्टरी व देवळाली प्रवरात ८ दिवस लॉगडाऊन करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आजपासुन राहूरी फॅक्टरी व देवळाली प्रवरात जे  कोरोना बाधीत रूग्ण सापडतील त्यांचा हॉस्पिटलचा पुर्ण खर्च  तसेच व दुर्देवाने कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाचा संपूर्ण खर्च दोन्ही व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी युवकांनी तहसीलदार शेख यांच्याकडे केली. दोन्ही व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही सोशल डिस्टन्सिंग व प्रशासनाचे नियम पाळून आंदोलन छेडू असा इशाराही या युवकांनी दिला आहे.यावेळी सचिन तारडे,प्रमोद विधाटे, राजेंद्र साळुंके,अजिंक्य गायकवाड, किरण घाडगे,ज्ञानेश्वर मोरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.