Breaking News

भाजपचा टोला, अनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत !

 


मुंबई : महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं घेणं राजकीय नेत्यांना शोभणारं नाही, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून क्लासेस घ्यावेत, असा टोला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लगावला.  

महिला आयएएस अधिकाऱ्यांची नावं घेणं हे राजकारण्यांना न शोभणारं वक्तव्य आहे. राज्यात कोव्हिडची परिस्थिती असताना, मराठा आंदोलनाचा विषय असताना अशी वक्तव्यं करणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. आम्ही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत केलेल्या विधानाचं समर्थन करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.


अनिल देशमुख काय म्हणाले?

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 'लोकमत ऑनलाईन'च्या विशेष मुलाखतीत याबाबतचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न चार ते पाच पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला' असे अनिल देशमुखांनी सांगितले.

'आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असे वारंवार सांगितले गेले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्यात याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण मार्गी लावण्यात आले' असेही देशमुख म्हणाले.

'शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरुन बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या असे सांगितले होते. तसेच, एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावे त्यावेळी सांगितली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वेळीच थांबवला गेला' असा दावाही अनिल देशमुख यांनी केला होता. 

'नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही महत्त्वाची पदं दिली आहेत' असेही अनिल देशमुख म्हणाले.