Breaking News

"शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची इच्छा नाही"

 
मुंबई - राज्यातील उध्दव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची कोणतीही इच्छा भारतीय जनता पक्षाची नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांत सुमारे अडीच तास चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला प्रारंभ झाला होता.

फडणवीस पत्रकारांना म्हणाले, जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला त्रासली आहे. त्यांच्या कारभारामुळेच हे सरकार पडणार आहे. आम्हाला शिवसेनेशी हातमिळवणी करण्यात अथवा हे सरकार पाडण्यात कोणतेही स्वारस्य नाही. हे सरकार पडते की नाही तुम्ही पहाच, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाला मुलाखत देण्यासंदर्भात शनिवारी मी राऊत यांना भेटलो होतो. त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता. त्यांनी सामनासाठी मला मुलाखत द्याल का, अशी विचारणा केली. त्याला मी तयार झालो. पण मात्र ही मुलाखत विनासंपादित होता छापली पाहिजे. त्यावेळी मी माझ्या कॅमेऱ्याने ती छायाचित्रित करेन, अशी अट टाकली. त्याबाबतच्या अटी ठरवण्यासाठी आम्ही भेटलो होतो, असे ते म्हणाले.

राऊत म्हणाले, मी आणि फडणवीस काही शत्रू नाही आहोत. या मुलाखतीसाठी घेतलेल्या भेटीची फडणवीस यांना कल्पना होती. दरम्यान या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी राऊत यांच्यावर टीका केली ाहे. त्यांना मथळ्यात स्थान मिळवण्याची घाई झाली आहे. एकदा असे झाले की राजकीय अधोगती सुरू होते. ही राऊत यांच्या विषयी असणारी वाईट इच्छा नसून वस्तूस्थिती आहे.