Breaking News

सर्वाधिक महागला जेष्ठांचा आरोग्य विमा

 


मुंबई : ६० ते ७० वर्षे वयोगटातल्या जेष्ठांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यासाठी सरासरी २६ ते ३० हजार रुपयांचा प्रिमियम आकारला जात होता. मात्र, १ आँक्टोबरपासून बहुतांश प्रमुख विमा कंपन्यांनी आपल्या विम्याचा प्रिमियम वाढविण्याचा निर्णय घेतल्याने या विमा संरक्षणासाठी त्यांना आता जवळपास ४० ते ४५ हजार रुपये मोजावे लागतील. सर्वच वयोगटांसाठी दरवाढ झाली असली तरी जेष्ठांच्या श्रेणीत या वाढीचा टक्का जास्त असल्याची माहिती हाती आली आहे.

कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका जेष्ठ नागरिकांनाच आहे. रुग्णालयीन उपचार घेणारे आणि उपचारादरम्यान मृत्युमुखी पडणा-यांमध्येही त्यांचीच संख्या जास्त आहे. पुढील काही महिने तरी कोरोनाचा प्रभाव राहणार असल्याने या जेष्ठांची विमा पाँलिसी कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे त्या वयोगटासाठी प्रिमियमच्या रकमेत जास्त वाढ झाल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. इन्शुरन्स रेग्युलेटरी अथाँरिटी आँफ इंडियाची (आयआरडीएआय) पूर्व परवानगी घेत ही वाढ करण्यात आली आहे. २५ ते ३० वयोगटात पाच लाखांच्या पाँलिसीसाठी साधारमतः ५५०० रुपये प्रमियम होता. तो आता ६,६०० च्या आसपास असेल. ५१ ते ५५ वयोगटाला तेवढ्याच विम्यासाठी १५,००० रुपयांऐवजी १७९०० रुपयांपर्यंतचा प्रिमियम द्यावा लागेल.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आरोग्य विमा पाँलिसी काढणा-यांची संख्या वाढू लागली असली तरी रुग्णालयांत उपचार घेणा-यांचे क्लेमही वाढू लागले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे विमा पाँलिसी महागणार अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. ती आता प्रत्यक्षात लागू होताना दिसत आहे. विविध वयोगटांसाठी आणि विम्याच्या रकमेनुसार ५ ते २५ टक्क्यांपर्यंत प्रिमियम वाढविण्यात आला आहे. त्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक वाढ ही ५५ पेक्षा जास्त वयोमान असलेल्या गटासाठी झालेली दिसते. कोरोना संक्रमणामुळे अनेकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच नवी पाँलिसी किंवा जुन्या पाँलिसीचे नुतनिकरण महागल्याने अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे काही जणांनी नियमित आरोग्य विमा न काढता केवळ कोरोना कवच ही पाँलिसी काढण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.