Breaking News

सैनिकांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याबाबत गृहमंत्र्यांची भेट घेणार - आ.डॉ किरण लहामटे

सैनिकांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याबाबत गृहमंत्र्यांची भेट घेणार - आ.डॉ किरण लहामटे


अकोले/प्रतिनिधी :
आजी माजी सैनिकांवर दाखल  होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दल आपण लक्ष घालणार असून त्यासाठी  आपण लवकरच गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना भेटणार असल्याची ग्वाही आ.डॉ किरण लहामटे यांनी दिली.
       अकोले येथे हुतात्मा स्मारकात महाराष्ट्र राज्य  त्रिदल माजी सैनिक संघटनेचा मेळावा आ.डॉ किरण लहामटे यांच्या अध्यक्षस्थानी व त्रिदल माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष मेजर संदीप लगड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अध्यक्षीय।भाषणात आ.लहामटे बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव,अजय देशमुख,शरद चव्हाण,अकोले तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर जगताप,विरपत्नी लहानुबाई 
मालुंजकर,त्रिदल माजी सैनिक महिला आघाडीच्या अकोले तालुका अध्यक्षा दिलशाद शेख,माजी अध्यक्ष रामनाथ कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी बोलताना त्रिदल माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष मेजर संदीप लगड म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पण याच भूमीत माजी सैनिकांना चेचुन मारलं जात आहे.त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे, सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत हा सर्व अन्याय थांबविण्यासाठी त्रिदल माजी सैनिक संघटनेचा जन्म झाला आहे.आता आमची मानसिकता संपलेली आहे यापुढे माजी सैनिकांवर महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या आजी माजी सैनिकांकडे पाहून "जर कोणी खोकले,तर त्याला ठोकले' अशा कडक शब्दात संदीप लगड यांनी इशारा दिला.
        पुढे बोलताना लगड म्हणाले की,सरकारने माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली हे फक्त अश्वासन आहे या संदर्भातील शासन निर्णय हा चुकीचा आहे. माजी सैनिकांचा जर शासनाला खरंच अभिमान असेल तर त्यांनी माजी सैनिकांचे पाणी पट्टी,विजबिल माफ करावे तसेच टोल,टॅक्स माफ करावा,माजी सैनिकांवर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत तसेच माजी सैनिकांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढावे अशी मागणी यावेळी लगड यांनी केली.
       यावेळी अकोले तालुका माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सचिन नवले,सचिव विजय देशमुख,माजी सैनिक पत्नी जिजाबाई मालुंजकर,माजी सैनिक पत्नी अलका लगड,बबन हाळकुंडे आदींचीही यावेळी उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रशांत धुमाळ यांनी केली तर आभार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर जगताप यांनी मानले.