Breaking News

सिनेमागृह, शॉपिंग मॉल उघडण्याची शक्यता

 - अनलॉक-5 च्या गाईडलाईन्स लवकरच जारी होणार

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार येत्या 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक-5 च्या गाईडलाईन्स लागू करणार आहे. या गाईडलाईन्स दरम्यान केंद्र सरकार सिनेमागृह, शॉपिंग मॉल तसेच पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरु करण्याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. 

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय काही निर्बंध शिथील करु शकते, असे बोलले जात आहे. तसेच आगामी बिहार निवडणुका पाहता केंद्राकडून येत्या काही दिवसात अनलॉक - 5 च्या गाईडलाईन्स जारी केल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे, सणांच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक स्थळांवर निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी टाळणे अशा काही अटी-शर्तीद्वारे  ही सूट दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अनेक शॉपिंग मॉल्सलाही या गाईडलाईन्सदरम्यान सूट दिली जाऊ शकते. शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. तसेच शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.

--------------------