Breaking News

सर्व आरक्षणे रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या!

 - खासदार उदयनराजेंची मागणी

सातारा/ प्रतिनिधी

मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. सातार्‍यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी हे मत व्यक्त केले.

मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. याआधीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र असे झाले नाही, असेही उदयनराजे म्हणाले. पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्‍नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यासह काही नेत्यांनी सातार्‍यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी आरक्षण प्रश्‍नावर त्यांनी चर्चा केली. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा, असे उदयनराजे म्हणाले. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती. या जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणार्‍या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावे, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे, असे विनायक मेटे म्हणाले होते.