Breaking News

डाव्या पक्षांच्यावतीने नगरमध्ये शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध !

 


अहमदनगर :- कृषी व कामगार विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी तसेच सामान्य माणूस रस्त्यावर उतरला असून केंद्रातील मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी व कामगार विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व डाव्या पक्षांच्यावतीने शहरातील मार्केट यार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून कोतवाली पोलिस ठाण्यात आणले व नंतर काही काळाने त्यांना सोडून देण्यात आले.

या विधेयकाच्या विरोधात देशभर निदर्शने होत असताना, पंजाब, हरियाणा तसेच उत्तर भारतातील शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. महामार्ग, रेल्वे मार्गावरही शेतकरी आंदोलन करीत आहेत. काल नगरमध्येही याचाच प्रत्यय आला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी ॲड.सुभाष लांडे, बन्सी सातपुते, भारती न्यालपेल्ली, बहीरनाथ वाकले, ॲड.सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, दीपक शिरसाट, सतीश निमसे, कार्तिक पासलकर, सतीश पवार, विजय केदारे, सुनील ठाकरे, आकाश साठे, राजू निमसे, सुभाष शिंदे, दत्ता वडवणीकर यांच्यासह डाव्या विचारांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.