Breaking News

एकाचवेळी २७ कैद्यांना कोरोनाची लागण !

 


अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कर्जत येथील उपकारागृहामध्ये असलेल्या ४९ कैद्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये कारागृहातील २७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग व पोलिस विभाग यांच्यासह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

कर्जत येथील जुन्या पोलीस स्टेशन इमारतीमध्ये उपकारागृह आहे. येथे ४९ पोलिस कस्टडी व न्यायालयीन कस्टडी मिळालेले कैदी ठेवण्यात आले आहे. यामधील काही कैद्यांना आजारी असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नेण्यात आले होते. तेथे उपचार घेऊन काही कैदी परत आले परंतु पुन्हा काही कैद्यांना त्रास जाणवू लागल्याने कैद्यांनी तशी माहिती पोलीस अधिकारी यांना दिली. पोलीस अधिकारी यांनी ही माहिती तातडीने आरोग्य विभागात कळवली.

आरोग्य विभागाने याठिकाणी कैद्यांसाठी खास कोरोनाची टेस्ट करण्याची व्यवस्था केली. ४९ कैद्यांची याठिकाणी चाचणी होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाला असता त्यामध्ये २७ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वास्तविक कारागृहात कडेकोट बंदोबस्तात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे कोणतेही कारण नाही. एकदम २७ कैदी कोरोना बाधित झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.