Breaking News

अंत्यविधीसाठी लागणाऱ्या जळनाच्या लाकडाचा खर्च चांदेकसारे ग्रामपंचायत उचलणार - केशवराव होन !

अंत्यविधीसाठी लागणाऱ्या जळनाच्या लाकडाचा खर्च चांदेकसारे ग्रामपंचायत उचलणार - केशवराव होन !
( महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी तालुक्यातील  पहीलीच ग्रामपंचायत )

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरातील नागरिकांसाठी ग्रामपंचायतीने क्रियाशील उपक्रम हाती घेतला असून परिसरात निधन झालेल्या कोणत्याही व्यक्तींचा अंत्यविधीसाठी जळनाच्या लाकडांचा लागणारा खर्च चांदेकसारे ग्रामपंचायत उचलणार असल्याची माहिती माजी सरपंच केशवराव होन यांनी दिली.समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी दरी असून त्यांना दोन वेळचे जेवणही मिळणे कठीण असते. 
     त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्या व्यक्तीच्या अंत्यविधी साठी देखील पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा व्यक्तींची मोठी हेळसांड होते. आपल्याच गावातील अशा कोणत्याही व्यक्तीवर ही वेळ येऊ नये म्हणून सरसकट गावातील कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या पार्थिवाला जळण्यासाठी लागणारा  लाकडाचा सर्व खर्च ग्रामपंचायत करणार आहे. यासंदर्भात केशवराव होन यांनी सूचना केल्यानंतर सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या संदर्भात ठराव संमत केला. 
     तसेच ग्रामपंचायतीने सर्वांना आवाहन केले की मयत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होतो. मात्र ती रक्षा नदी किंवा एखाद्या वाहत्या नाल्यात टाकली जाते. यापुढे असे न करता रक्षा विसर्जन झाल्यानंतर ती रक्षा मयत व्यक्तीच्या घराच्या बाजूला किंवा शेतात टाकून त्या व्यक्तीच्या नावाने एक वृक्ष लागवड करून त्यांची आठवण चिरंतन ठेवावी असे आवाहन सरपंच पुनम खरात व उपसरपंच विजय होन यांनी केले. तालुक्यातील हा निर्णय घेणारी चांदेकसारे ग्रामपंचायत पहिलीच असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे चांदेकसारे पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.