Breaking News

नेतागीरीने भानावर यावे !

  नेतागीरीने भानावर यावे!

सुशांतसिंह राजपूतच्या निमित्तानं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन सध्या भलतेच  चर्चेत आहे. आत्महत्येवरून उठवलेला गदारोळ मायानगरीतील ड्रग्ज कनेक्शन शोधण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आपला एक वेगळा वकूब निर्माण करणारी मायानगरी जगाच्या पाठीवर प्रसिध्दीच्या झोतात आहे. त्याचे सारे श्रेय अर्थातच पेज थ्री पञकारीतेला आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणारी मंडळी या कार्यात आघाडीवर आहे. महाराष्ट्राची होईल तेव्हढी बदनामी करण्याची संधी या निमित्ताने साधली आहे. आमची नेतागीरी माञ यातून अजूनही बोध घ्यायला तयार नाही.


मुंबईच्या पोटात वसलेली  माया नगरी   एक जादूई नगरी आहे.या मायाविश्वाने  चांगल्या-चांगल्यांना भूरळ घालून आपल्या पाशात अडकवले आहे. मुंबईतील या मायानगरीला जन्मास घालून आंतरराष्ट्रीय चेहरा देण्याचे काम चिञमहर्षी दादासाहेब फाळके यांनी केले आहे.कुठल्याही अत्याधुनिक तंञज्ञानाशिवाय मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावण्यासाठी दादासाहेबांनी घेतलेले  अथक परिश्रम  हरणाचे मटन खावून मद्यधुंद होऊन रस्त्यावर झोपलेल्या गरीबांना चिरूडन टाकणार्‍या तथाकथित कलावंतांना आणि भांग, गांजा, चरस सारखे ड्रग्स घेऊन निर्माता दिग्दर्शकांची सर्वांगी हौस भागविणाऱ्या  आयटम्सला काय समजणार?


मुंबई मायानगरीमध्ये  काही ठराविक निर्मात्यांची, दिग्दर्शकांची सध्या मक्तेदारी निर्माण झाली आहे, या माक्तेदारानी या मुंबापुरीतील मायानगरीचे गुन्हेगारीकरण करण्याची मुहुर्तमेढ रोवली. बॉलिवुडची चमक जेव्हढी छान भासते त्याहून कितीतरी अधिक ती दुर्गंधित आहे. या सृष्टीचे अंतरंग पुर्णतः व्याभीचारी आहेत. अशी चर्चा कानावर आजपर्यंत आदळत होती. आता सुशांतच्या मृत्यूपासून ड्रग्ज कनेक्शनपर्यंत उघड होत असलेल्या रहस्याने या चर्चेवर शिक्कामोर्तबच केले आहे. ड्रग्जचीलत लागलेली ही मंडळी कुणासोबत कसे उघडे नागडे संबंध ठेवते याचा कच्चा चिठ्ठा सुशांतच्या आत्महत्येने चव्हाट्यावर आलाय.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सरकारला अडचणीत आणणारे हे प्रकरण जाणिव पुर्वक हाताळले जात आहे. एका कोपऱ्यातला हा मुद्दा राष्ट्रीय प्रश्न बनविण्याचा आटापिटा महाराष्ट्राच्या बदनामीच्या हेतूनेच सुरू आहे. ही बाब महाराष्ट्रातील नेत्यांना समजू नये ही खरी शोकांतिका आहे.  

प्रश्न ड्रग्जचा चर्चेत असताना महाराष्ट्र सरकार व्यसनाधिनतेने इतके व्यथीत झाले की सिगारेट बिड्या सुट्या विकता येणार नाहीत असा फतवाच सरकारने काढला आहे. या फतव्याकडे पाहून हसावे की रडावे हेच समजत नाही. राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे. व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठी हा आदेश काढल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश देखील सरकारने पोलिस आणि महापालिकेला दिले आहे. सरकारचा हा निर्णय ऐकल्यावर आता 'होलसेल व्यसनं' करा असाच जणू सरकारने आदेश दिल्याची चर्चा महाराष्ट्र सरकारच्या विचारांची दिवाळखोरी बाजारात मांडत आहे. नशा नेमकी कशी आणि कशाने होते याचा स्वतंञ संशोधन विभाग सुरू करण्याची वेळ आली आहे.

सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास  'आरोग्याच्या धोक्याची कल्पना' कशी हा साध्य होणार ?.  सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची सुचना मिळणार नाही, म्हणून ही सोय केल्याचा युक्तीवाद सरकारतर्फे केला जात असला तरी तो युक्तीवाद संयुक्तिक वाटत नाही.म्हणूनच महाराष्ट्राची सामुहिक बदनामीच्या षडयंञाला मात देण्यासाठी नेतागीरीने भानावर यावे, इतकेच.