Breaking News

शेतकऱ्यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर कांदा निर्यात बंदी निर्णयाचा माजी आमदारांनी निषेध करावा -चारुदत्त सिनगर !

शेतकऱ्यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर कांदा निर्यात बंदी निर्णयाचा माजी आमदारांनी निषेध करावा -चारुदत्त सिनगर !


कोपरगाव प्रतिनिधी –
सत्तेत असतांना शेतकऱ्यांसाठी ज्यांना करता काही आले नाही उलट यशस्वी होत असलेल्या शेतकरी संपात मिठाचा खडा टाकून शेतकरी संप मोडणाऱ्या माजी आमदार मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांबाबत गळा काढत आहे. त्यांना शेतकऱ्यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर केंद्राने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा त्यांनी निषेध करावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना केले आहे.
          केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने सोमवारी मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रचंड नाराजी वाढली आहे. नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची वैश्विक कोरोना महामारीमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. लॉक डाऊनच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जाणारी द्राक्षे शेतकऱ्यांनी मातीमोल भावात विकली त्यातून शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील सुटलेला नाही. दुसरीकडे डाळींबावर मोठ्या प्रमाणात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हजारो हेक्टर डाळींब बागा उध्वस्त झाल्या. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतीवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे साठविलेले कांदे भिजले तर अनेक शेतकऱ्यांचे कांदे चाळीतच सडले आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या थोड्या फार चांगल्या कांद्यावर शेतकरी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत असतांना केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा अघोरी निर्णय घेवून शेतकऱ्यांच्या जखमेवर अक्षरश: मीठ चोळले आहे.अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार शेतकऱ्यांविषयी पुतना मावशीचे प्रेम दाखवून आपली प्रसिद्धी करून घेत आहे.
                 माजी आमदार या देखील शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना देखील माहित आहे की, कांद्याचे होणारे एकरी उत्पन्न, कांद्याचा होणारा उत्पादन खर्च व त्या खर्चाच्या तुलनेत कांद्याला किती दर मिळणे अपेक्षित आहे याची जाणीव त्यांना नक्कीच असणार आहे. मागील काही महिने लॉक डाऊनमुळे  हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे कांद्याला मागणी कमी असतांना शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी जो काही कांदा विकला तो कवडीमोल भावाने विकला आहे. आता कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढले असतांना शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडण्यास सुरुवात झाली मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध नोंदविला जात आहे. अशा वेळी शेतकऱ्यांविषयी गळा काढणाऱ्या राजकीय नेत्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा निषेध हा केलाच पाहिजे. त्यामुळे तालुक्याच्या माजी आमदारांना माझे आवाहन आहे की, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा त्यांनी निषेध करावा. त्यांनी या निर्णयाचा निषेध केला नाही तर त्यांचे शेतकऱ्यांविषयी असलेले प्रेम हे बेगडी असल्याचे सांगण्यासाठी शेतकऱ्यांना कुणा ज्योतिषाची गरज लागणार नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी म्हटले आहे.