Breaking News

भारतभर साजरा झाला राष्ट्रीय बेरोजगार दिवस!

- मोदी वाढदिवस!

- तरुणांनी पंतप्रधान मोदींची उडविली खिल्ली

- सोशल मीडियावर मिम्सचा पाऊसनवी दिल्ली/ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर हा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त तरुणांनी मोदी यांची चांगलीच खिल्ली उडवली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याबाबत मिम्स पहायाला मिळाले. मोदी सरकारने दिलेल्या  आश्‍वासनांची आठवण करुन देत अनेकांनी राष्ट्रीय बेरोजगारी दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्‍न विचारले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी, 70 वा वाढदिवस साजरा झाला. यानिमित्त भाजपच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले असताना भारतीय तरुणांनी मात्र हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचे सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य , जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे. परंतु, मोठ्या संख्येतील तरुणांनी मात्र या सेवाकार्याची आणि एकूणच मोदींची सोशल मीडियावर खिल्ली उडवली. तर दुसरीकडे भाजपच्या विरोधकांनीदेखील मोदींवर टीका केली तसेच त्यांनी दिलेली आश्‍वासने कशी फसलीत, याची उजळणी केली. तरुणवर्गाने  मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सोशल नेटवर्किंगवर तुफान प्रतिसाद मिळाला. कोरोना विषाणूच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर अचानक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून, देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्‍वासनांची आठवण करुन देत अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्‍न विचारले आहेत. भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्‍वासन दिलेले, असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आलेहोते.


अवघ्या तासाभरात दोन लाख ट्वीटस!

राष्ट्रीय  बेरोजगारी दिवस या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांमध्ये दोन लाख 28 हजार ट्विट करण्यात आले होते. दिवसभर तरुण-तरुणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टीकात्मक व खोचक ट्वीट केले. तसेच, फेसबुक, व्हाटसअप, ट्वीटर या सोशल मीडिया प्लॅटफार्मवरही मोदींच्या धोरणांची व फसव्या आश्‍वसनांची जोरदार खिल्ली उडविण्यात आली होती. त्यामुळे मोदींचा यावर्षीचा वाढदिवस चांगलाच चर्चेचा ठरला.

--------------------