Breaking News

सुज्ञास अधिक सांगणे न लगे !

 सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

     


    महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याची बातमी वातावरण अस्थिर करण्यास कारणीभूत ठरले आहे. या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली याविषयी खुद्द शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे ही शाश्वतपणे सांगू शकणार नाहीत. राऊत-फडणवीस जोडीचं याचे उत्तर देऊ शकते. सध्याच्या तिघाडी सरकारच्या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळ्या नजरेतून पाहीले जाऊ लागले आहे. या भेटीनंतर डिसेंबर अखेर महाविकास आघाडी सरकार पडेल या भाकीताला पुन्हा पालवी फुटू लागली आहे. खरोखर वर्षाखेरीस नवं सरकार स्थापन होऊ शकेल का?. 

     राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. परंतू नैतिकतेच्या आधारावर काही पथ्ये पाळावयाची असतात. याचे भान रोखठोककार संजय राऊत यांना खरोखर आहे का? असा सवाल महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जाऊ लागला आहे, आपल्या लेखणातून सतत वादग्रस्त विषय हाताळून सनसनी निर्माण करणारे संजय राऊत सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी माध्यमांच्या अजेंड्यावर होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळेच भाजपचे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते.

देवेंद्र फडणवीस आणि भाजपातील सामान्यातील सामान्य कार्यकर्ते संजय राऊत यांना ट्रोल करण्याची कुठलीच संधी सोडत नव्हते. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊत भाजपाच्या डोक्यात फिट बसले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा परिस्थितीत संजय राऊत , देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय होणार नाही अशी कुणाची समजूत असेल तर त्यांना विद्यमान राजकारण समजून घेण्याची गरज आहे असे म्हणावे लागेल. राजकारणातील ही आचार संहीता संजय राऊत यांना  माहीत नसेल असे म्हणणेही मुर्खपणाचे होईल. मग प्रश्न पडतो तो संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट का घेतली असेल?

    स्व.बाळासाहेबांच्या शिवसेनेने असंख्य  नेते घडवलेत. ज्यांना गल्लीतही निवडणूक लढवणे शक्य नव्हते अशा साध्या कार्यकर्त्याला आमदार केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतच नव्हे तर लोकसभेच्या सभापती पदापर्यंत देखील पोहचवले. शिवसेनेचा हा राजकीय इतिहास फार जुनाही  नाही. राजकीय वारसदार निर्माण करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात आणि अल्पसंख्यांकांचे चोचले  पुरवणार्‍या धोरणा विरोधात हिंदुत्वाच्या मुद्द्दयाला उचलून शिवसेनेची स्थापना झाली. ज्याचा समाज अल्प आहे, ज्यांना  दोन वेळची भ्रांत  आहे  अशा सामान्य पानटपरी धारकालाही राजकारणाच्या मुख्यप्रवाहात आणून सत्तेत सामावून घेतले, कोणताही राजकीय वारसा नाही अशा शिवसैनिकांना न्याय देण्याची भूमिका बाळासाहेबांनी स्वीकारली  आणि म्हणूनच, शिवसेना प्रमुखांच्या  शब्दांवर जनतेचा विश्वास बसला.

    स्वाभिमानी बाळासाहेबांनी सत्तेसाठी कुणापुढेही कधीही हात पसरला नाही. यालाच शिवसेनेचा स्वाभिमानी बाणा म्हटले गेले. परंतू सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ही म्हण सुध्दा राजकारणातच तयार झाल्याने सत्तेसाठी काहीही तडजोडी अलिकडच्या राजकारणात राज्यात नव्हे तर देश पातळीवरच्या राजकारणात देखील केल्या गेल्या. आजची शिवसेनाही त्या पायंड्याला अपवाद राहीली नाही. बाळासाहेबांच्या मुशीत तयार होऊनही संजय राऊत यांनी या नव्या मार्गावर पाऊल टाकून शिवसेनेचा मुख्यमंञी बनवला.

   देशात आम्ही, म्हणून राज्यातही आम्हीच  असा पेशवाई अहंकार फडणवीसांना झाला. आणि युती तुटली अर्थात या युती तुटण्याला संजय निती’ जबाबदार आहे. या घडामोडींना आठदहा महिने होत असताना राज्यातील वातावरण बदलले. सुशांतसिंग प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. ठाकरे सरकार अस्थिर करण्याचे अस्र म्हणून विरोधकांनी सुशांतच्या आत्महत्येचा वापर केला. यामागे भाजपा विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत. हे जगजाहीर आहे. या प्रकरणाशी मातोश्रीचे नाव जोडले जात असतांना उठलेला धुराळा थांबविण्याची जबाबदारी अर्थातच संजय राऊत यांच्यावर असेल याविषयी शंका असण्याचे कारण नाही. या पार्श्वभूमीवर राऊत फडणवीसांच्या गुप्त बैठकीचा वेगळा संदर्भ लावण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अगदीच तथ्यहिन म्हणता येणार नाही. माञ केवळ हे एकच कारण या भेटीमागे असेल असे वाटत नाही. राजकारणात सरकार बदलण्याची सुरू असल्याची अफवा कदाचीत या भेटीवर संशय निर्माण करीत आहे.

    या नव्या चर्चेमुळे डिसेंबरपर्यंत सरकार पडेल आणि महाराष्ट्रात नवे सत्ताकारण पहायला मिळेल का असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. शरद पवार यांचाही या नव्या समिकरणात महत्वाची भुमिका असेल असे खुलेपणाने बोलले जाऊ लागले आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.