- राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांची लोकमंथनशी चर्चा - वसंत मुंडेंच्या भूमिकेने वृत्तपत्र क्षेत्राचे अर्थगणित बदलणार का? अहमदनगर/...
- राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांची लोकमंथनशी चर्चा
- वसंत मुंडेंच्या भूमिकेने वृत्तपत्र क्षेत्राचे अर्थगणित बदलणार का?
अहमदनगर/ खास प्रतिनिधी
‘बनते त्या पेक्षा स्वस्तात विकले जाणारे जगातले एकमेव उत्पादन म्हणजे वर्तमानपत्र,’ बनते 10 रुपयात अन विकते 3 रुपयात , 1 रुपयाचा चहा 10 ला झाला, चार आण्याच्या दोन कोंबडा बिड्या ओढणारा समाज आता 15 रुपयाची लाईट सहज घेऊ शकतो. बिस्किटाच्या पुढ्यावर देखील सर्विस टक्स लावला जातो मात्र भल्या पहाटे दारात येणारा पेपर फुकट मिळतो . या क्षेत्राने वसा या नावाखाली आपली प्रगतीच नाकारली आणि दुर्दैवाने हे क्षेत्र केवळ मेटाकुटीला नाही तर पुढची पिढी देईल का नाही या शासंक वळणावर येऊन ठेपले आहे . जगाला आणि जगण्याला समृद्ध करणार्या या क्षेत्राला लोकाश्रय असेल नसेल मात्र अर्थाश्रय मिळवून देण्यासाठी बीडच्या भूमीपुत्राने निर्णायक आणि ऐतिहासिक भूमिका घेतली आहे . वसंत मुंडे यांच्या ओळखीची गरज नाही, पेपर टाकणारा युवक ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष असलेले वसंत मुंडे यांनी मोठी अभ्यासपूर्ण भूमिका घेतली आहे.
प्रश्न - नमस्कार , नक्कीच ओळख देण्याची गरज नसल्याने वसंत मुंडे यांच्या सोबत आज तुमची भूमिका जाणून घेणार आहोत . काय सांगाल?
उत्तर - सरकारचे धोरण, कोरोनाचे संकट, समाज माध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे वृत्तपत्र माध्यम अडचणीत सापडले आहे. विभाग, जिल्हा स्तरावरुन प्रकाशित होणारे शेकड्याने वृत्तपत्र बंद असून पुन्हा सुरू होतील का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात अवघ्या चार महिन्यात जाहिराती कमी झाल्याने पन्नास, पंचवीस वर्षाची परंपरा असलेल्या दैनिकांनाही खर्च परवडत नसल्याने संपादकासह पत्रकार आणि इतर विभागातील कर्मचार्यांना कामावरुन कमी केले जात आहे. तर काही वृत्तपत्रांनी कर्मचार्यांच्या पगारात मोठी कपात केल्याने या क्षेत्रातील जवळपास तीस हजार पेक्षा जास्त लोकांच्या हातचे काम गेले असुन अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ ओढावली आहे.
प्रश्न - तरीही हे क्षेत्र टिकून राहिले
उत्तर - तर , व्यवसायातील लोकांचा प्रामाणिकपणा, वाचकांचा विश्वास यावर वृत्तपत्र टिकून राहिली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने वृत्तपत्रे मिशन म्हणून निघाली. स्वातंत्र्योत्तर काळात अडाणी समाजाला जागृत करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि राजसत्तेवर अंकुश म्हणून वृत्तपत्रांनी भूमिका बजावली. समाजाचा, राजकीय नेतृत्वाचाही वृत्तपत्र माध्यमांकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक होता. त्यामुळे या क्षेत्राला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली.
प्रश्न - बदलत्या जगात आणि धोरणात याच क्षेत्राचे अर्थशास्त्र का बदलले नाही
उत्तर - जागतिकीकरणामध्ये इतर क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र व्यवसायातही नवे तंत्रज्ञान आल्याने झपाट्याने बदल झाला. प्रसारमाध्यमांचे स्वरुपही बदलत जाऊन नवीन माध्यमे विकसित झाली. मात्र जागतिकीकरणातील बदलाच्या तुलनेत वृत्तपत्र व्यवसायाच्या अर्थकारणात मात्र फारसा बदल झाला नाही. या क्षेत्रातील दिग्गज बुध्दीवाद्यांनी, काम करणार्या पत्रकारांनी सामान्य गरीब राहुनच समाजाचे प्रश्न मांडावेत ही अपेक्षा तत्वाच्या नावाखाली माथी मारली. प्रत्यक्षात वृत्तपत्र व्यवसायात भांडवलदार, राजकारण्यांनी शिरकाव करुन फायदा करुन घेतला. मात्र वृत्तपत्र व्यवसाय जाहिरातदारांच्या मदतीवरच अवलंबून राहील अशीच व्यवस्था राबवली. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्या संपादक, पत्रकार, वार्ताहारांना कायम जाहिरातदार राजकीय पुढारी आणि उद्योजकांच्या दारात उभे केले. जाहिरातीचे टारगेट पूर्ण करण्याचा दबाव आणि वसुलीवर महिन्याचा पगार ही परिस्थिती समाजाचे प्रश्न मांडणार्या संपादक, पत्रकारांची असल्याने अप्रत्यक्षपणे जाहिरातदारांचे गुलामच केले. कोरोना संकटाने व्यवसाय बंद झाल्याने आणि समाज माध्यमाचे प्रभावी अस्त्र आल्यामुळे जाहिरात आता जवळपास बंद झाल्याने वृत्तपत्रांसमोर अंक प्रकाशित कसा करायचा? असा प्रश्न आहे. वृत्तपत्राचा आठ पानाचा एक अंक तयार करण्यासाठी जवळपास एकूण दहा रुपये खर्च येत असताना एकही रुपयाची जाहिरात नसल्यामुळे तीन रुपयात विकून सात रुपयांचा तोटा भरायचा कोठून? यामुळे बहुतांशी दैनिकांनी प्रकाशन बंद ठेवून ऑनलाईन वर भर दिला आहे.
प्रश्न - दैनिकांच्या अर्थशास्त्र वर केवळ भूमिका नाही तर कृती कार्यक्रम घेऊन येणारे आपण पहिले आहेत. नक्कीच आपण तो काय कार्यक्रम आहे हे सांगाल
उत्तर - होय, वृत्तपत्र चालकांना आणि पत्रकारांना भविष्यात जाहिरातदारांच्या भीकेवर हा व्यवसाय चालवण्याची मानसिकता बदलून इतर व्यवसायाप्रमाणे विक्री किंमत वाढवूनच हा व्यवसाय टिकवण्याचे आव्हान पेलावे लागले. वृत्तपत्राच्या विक्री किंमतीतूनच चांगले उत्पन्न उभे राहिले तर वितरकांना कमिशनच्या माध्यमातून चांगला पैसा मिळेल. तर पत्रकार आणि कर्मचार्यांनाही पुरेसा पगार मागण्याचा अधिकार आणि निर्भिडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य राहील. जाहिरात हा अतिरिक्त उत्पन्न मानले तरच जाहिरात दारांचीही मुजोरी कमी होईल. अलीकडे वृत्तपत्राला जाहिरात देणे म्हणजे उपकार केल्याची भावना निर्माण झाली असून जाहिरातीचे पैसे तर देण्याची मानसिकताच राहिली नाही. त्यामुळे जाहिरातीच्या उत्पन्नावर तोटा भरुन काढण्याचा अर्थकारण आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय लोकही मागच्या पाच वर्षात एक रुपयाचा चहा थेट दहा रुपये किंमतीमध्ये उभे राहून घेतात. तर एक लिटर पाण्याची बाटली तब्बल वीस रुपयांना कोणतीही कुरकुर न करता खरेदी करतात. एका ए4 आकाराच्या झेरॉक्स काढण्यासाठी दोन रुपये द्यावे लागतात. ए4 साईजचे चार पेज एकत्र केल्यानंतर वर्तमानपत्राचे एक पेज होते. केवळ झेरॉक्सचा हिशोब केला तरी वृत्तपत्राच्या एका पानासाठी आठ रुपये लागतील. बाजारात अशा पध्दतीचा दर असताना आठ पानाचे वृत्तपत्र केवळ दोन रुपये किंमतीमध्ये घरपोहच दिले जाते. दोन रुपये किंमतीत वितरकांना पन्नास टक्के कमिशन दिले जात असल्याने वृत्तपत्र व्यवस्थापकाच्या हातात केवळ एक रुपया पडतो. कोणत्याही वस्तुची घरपोहच सेवा ही अतिरिक्त करासहित दिली जाते. उत्पादित प्रत्येक वस्तुची किंमत ठरवण्याचा अधिकार उत्पादक कंपनीला असतो. आणि ठरवलेल्या किंमतीत ग्राहकही घेतात. केवळ वृत्तपत्रच हे एकच उत्पादन कमी किंमतीमध्ये घरपोहच मिळते ही सवय बदलावी लागेल. वृत्तपत्रांची किंमत ठरवण्याचा अधिकारही आता वृत्तपत्र व्यवस्थापकांनी वापरला पाहिजे. कोणतीही बँक उत्पादन खर्च आणि विक्री किंमतीत किमान वीस टक्क्यांचा नफा असेल तरच सदरील व्यवसायाला कर्ज देण्याचा विचार करते. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसायातील उत्पादन खर्चाच्या तब्बल तीस टक्क्यांपेक्षाही कमी किंमतीत विकण्याचा व्यवसाय बँकेच्याही कुठल्याच अर्थगणितात बसत नसल्याने कोणतीही बँक या व्यवसायाला कर्ज देण्यासाठी दारातही उभी करत नाही.
...................................