Breaking News

सत्ता गेल्यानंतर माजी आमदारांना शेतकऱ्यांचा कळवळा आला का? – सुधाकर रोहोम

   सत्ता गेल्यानंतर माजी आमदारांना शेतकऱ्यांचा कळवळा आला का? – सुधाकर रोहोम


   कोपरगाव प्रतिनिधी  – 
     कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांवर ज्या ज्यावेळी संकट आली त्या त्यावेळी आमदार आशुतोष शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांनी  शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली हे मतदार संघातील शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यात अनुभवलं आहे. मात्र मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील मतदार संघातील शेतकऱ्यांना दमडीची मदत मिळवून देवू न शकणाऱ्या निष्क्रिय आमदारांना सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आला का ? असा उपरोधिक प्रश्न  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात विचारला आहे.
           दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी पावसाने झोडपून काढल्यामुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर अशी निसर्गनिर्मित संकट सांगून येत नसतात अशा संकटाच्या वेळी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मागे धीरोदत्तपणे उभे राहण्याचे काम आमदार आशुतोष काळे हे सत्ता नसतांना देखील करीत होते व सत्ता असतांना देखील करीत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्याबाबत झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून कोपरगाव तालुक्यातील ३७ हजार ५५४ शेतकऱ्यांना दोनच महिन्यात महाविकास आघाडी सरकारकडून पहिल्या टप्प्यात ८ कोटी २८ लाख व दुसऱ्या टप्प्यात १९ कोटी ६७ लाख रुपये असे एकूण २७ कोटी ९५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे याची शेतकऱ्यांना जाणीव आहे. याउलट २०१८ मध्ये कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असतांना कोपरगाव तालुका मात्र दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला होता. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांना आमरण उपोषण करावे लागले होते व शेतकऱ्यांना जिवंतपणी सरणावर बसावे लागले होते हे शेतकरी विसरलेले नाहीत. मागील पाच वर्षात अनेक वेळा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आली मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई तालुक्याच्या माजी आमदार मिळवून देवू शकल्या नाही. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना २०१५/१६ ला रब्बी अनुदान आजपर्यंत मिळालेले नाही. त्यासाठी आमदार आशुतोष काळे न्यायालयात गेले. विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला हे माजी आमदारांनी लक्षात घेतले पाहिजे.              
           आज जगासह संपूर्ण देशावर कोरोना संकटाचे सावट आहे. अशा परिस्थितीतून राज्याची आर्थिक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असून आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देखील मिळत व त्यांच्या अथक पाठपुराव्यातून मतदार संघातील शेतकऱ्यांना न्यायसुद्धा मिळत आहे त्यामुळे माजी आमदारांनी  मागील पाच वर्षाची आपली कामगिरी पाहून टीका टिप्पणी करावी असा सूचक सल्ला उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना दिला आहे.