Breaking News

महिलेचा खून करुन मृतदेह धरणात फेकला, आरोपींना अटक !

 


पनवेल : एका महिलेचा खून करुन तिला रस्सीच्या साहाय्याने मोर्बे धरणात टाकून पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवघ्या 48 तासात या खुनाचा उलगडा पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना सातारा कोरेगाव येथून अटक केली गेली आहे. 

या मृत महिलेच्या एका हातामध्ये बांगड्या आणि गोंदलेल्याचे चिन्ह होते. तसेच तिचा मृतदेहदेखील विवस्त्र असून तो संपूर्ण फुगला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. मात्र पनवेल तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासात या महिलेची ओळख पटवली. त्यानंतर पुढील तपासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.


यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही कोप्रोली गावात राहणारी आहे. या महिलेचे 32 वर्षीय युवकाशी अनैतिक संबंध होते. या महिलेकडून त्याने काही पैसेही घेतली होते. या पैशांवरुन त्यांच्यात नेहमी वाद होत होते. त्या वादातूनच त्याने साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी युवकाचा शोध घेतला. मात्र तो गुन्हा दाखल झाल्यापासून गावातून पसार झाल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपी आणि त्याचे इतर साथीदार हे मृत महिलेच्या 7 वर्षीय मुलीसह साताऱ्यातील कोरेगाव परिसरात फिरत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.


यानंतर कोरेगाव पोलिसांच्या मदतीने मृत महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या 32 वर्षीय युवकास तसेच त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या मृत महिलेच्या मुलीला बालगृहात ठेवण्यात आले आहे.