Breaking News

कोरोनाच्या महामारीत हातावरील पोट असणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ !

कोरोनाच्या महामारीत हातावरील पोट असणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ
-------------
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून कलावंतांच्या न्यायहक्कांसाठी प्रयत्न करणार-नितीन दिनकर


नेवासा तालुका प्रतिनिधी :
      कोरोनाच्या या महामारीमध्ये हातावरील पोट असणाऱ्या राज्यातील कलावंतांच्या समस्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांना न्याय देण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून कलावंतांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा निर्धार भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केला आहे त्यासाठी भाजप रस्त्यावर ही उतरेल असा ईशारा ही त्यांनी निवेदनात दिला आहे.
          सदर निवेदनात नितीन दिनकर यांनी म्हटले आहे की आज ज्यांना पैशाची कमी नाही अशा कलावंतांच्यावर मीडिया सह सोशल मीडियावर मोठया चर्चा रंगतांना दिसत आहे.मात्र गेल्या गेल्या सहा ते सात महिन्यापासून लॉकडाऊन नंतर सामाजिक अंतराचे पालन करा, एकमेकांशी संपर्क टाळा,स्व:तला सुरक्षित ठेवा, घराबाहेर पडू नका अशा सूचना करून त्याच्यासाठी समाजात मोठे प्रबोधन व जनजागृती करण्यात आली व येत आहे मात्र ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती सांगितली ती टिकविली अशा हातावरचे पोट असणाऱ्या कलावंतावर आलेली उपासमार सरकारला दिसत नाही का?असा वास्तववादी सवाल ही निवेदनात करण्यात आला आहे.
       आज कोरोनाच्या या महामारीमध्ये  जागरण गोंधळ करणाऱ्या वाघ्या,मुरळी,गोंधळी, पोतराज, वासुदेव,तमाशा कलावंत,एकांकिका नाटिका सादर करणारे कलाकार, इतरांच्या लग्न सोहळयात आनंदमय वातावरण निर्माण करणारे बँड कलावंत,डोंबारी,तिरमली, मसानजोगी, बहुरूपी,नंदीवाले,पिंगळा,चित्रकथी यांच्यावर उपासमारी ची वेळ आली आहे.सहन ही होत नाही सांगायला जावे तर दखल घेणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या  संस्कृतीची जपवणूक करणाऱ्या कलाकारांना सरकारने माणसी पंधरा हजार रुपये मानधन जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
       आज हे कलावंत वाड्यावस्त्यासह माळरानावर राहून वणवण फिरून भटकंती करत आहे कोरोनाने सर्वांच्या मनात धडकी भरविल्याने तसेच सरकारने निर्बंध घातल्याने गावातील लोक ही या कलाकारांना आमंत्रित करण्यासाठी पुढे येत नाही तरी महाराष्ट्राची संस्कृतीची जपवणूक करणाऱ्या अठरा पगड जातीतील कलावंतांना मानधन सुरू करून त्यांची उपासमारी दूर करावी अशी ही मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी निवेदनात केली आहे.सदरचे निवेदन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देऊन कलावंतांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून विनंती करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.