Breaking News

अहमदनगरमध्ये बलात्काराचा पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल !

 


अहमदनगर : ज्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्या पोलिसांवरच अहमदनगरमध्ये बलात्काराचा गंभीर आरोप झालाय. अहमदनगरला एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन एका पोलीस निरीक्षकावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता मार्च 2019 मध्ये फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची आरोपी पोलीस निरीक्षकाशी ओळख झाली. यानंतर हा अत्याचाराचा प्रकार घडला. संबंधित पोलीस निरीक्षकाने मागील एक वर्षापासून बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याचं पीडितेने म्हटलं आहे. या सव्वीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयातील या पोलीस अधिकाऱ्याने धमकावल्याचं पीडितीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिला नगर शहरातील रहिवासी आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.