Breaking News

भारत बंद : मोदी सरकारचा तीव्र निषेध, रेल्वेही रोखल्या!

- उत्तर व दक्षिण भारतात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
- राहुल गांधी, प्रियंका वढेरांसह विरोधकांचा मोदींवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात राजू शेट्टींसह राष्ट्रवादी काँग्रेसही आंदोलनात सहभागी


नवी दिल्ली/ खास प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी कृषिविधेयकांच्याविरोधात उत्तर व दक्षिण भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरले. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातही शेतकर्‍यांसह विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारचा तीव्र निषेध केला. पंजाब, हरयाना, बिहार राज्यांमध्ये शेतकर्‍यांनी रेल्वे रोके आंदोलन केल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दक्षिणेकडील राज्यांत रस्तारोकोसह अर्धनग्न आंदोलने करण्यात आली. भारतीय किसान युनियनसह काँग्रेस, डावे पक्षही या बंदमध्ये उतरले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या नेत्या प्रियंका वढेरा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी हे उद्योगपतींचे हस्तक असून, ते शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालायला निघाले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आक्रमक आंदोलन करत या विधेयकांच्या प्रति जाळल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाशवी संख्याबळाच्या जोरावर शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके पारित केली आहेत. या विधेयकांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करू नये, या मागणीसाठी विरोधकांसह डाव्या पक्षांनी व देशभरातील 15 राजकीय पक्षांसह, 21 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. दक्षिणेतील राज्ये, उत्तरेतील राज्ये यांच्यासह पंजाब, हरयाना, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये हा बंद यशस्वी झाला. शेतकरी रस्त्यावर उतरले होते. तसेच, महामार्ग रोखण्यात आले होते. पंजाब, हरयाना, बिहार व नवी दिल्ली या भागात तर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांचा किमान हमीभावदेखील बंद करून मोदी सरकारने शेतकर्‍यांचा हक्क डावलला आहे. कंत्राटी शेतीच्या माध्यमातून ते शेतकर्‍यांना उद्योगपतींचा गुलाम बनवणार आहेत, अशी टीका प्रियंका वढेरा-गांधी यांनी केली. तर ही विधेयके या देशात इस्ट इंडिया कंपनीराज आणणारे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी हिंसक आंदोलने केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांतही तीव्र आंदोलन झाले. तामिळनाडूत शेतकर्‍यांनी अर्धनग्न आंदोलने केली. महाराष्ट्रातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात या कृषिविधेयकांची होळी केली.15 विरोधी पक्षांसह 21 शेतकरी संघटनांचा आंदोलनात सहभाग

काँग्रेससह 15 विरोधी पक्षांनी व देशातील 21 शेतकरी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरीविरोधी कृषिविधेयकांना तीव्र विरोध केला आहे. या सर्व संघटना व पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला अनेक राज्यांत हिंसक वळण लागले. शेतकरी महामार्गावर उतरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच, रेल्वे रोकोमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी या कृषिविधेयकांची होळी करत पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.