Breaking News

आमदार व महापौर नगरच्या लॉकडाऊन बाबत निर्णय घेतील- हसन मुश्रीफ

 


अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले, श्रीगोंदा ह्या तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र अहमदनगर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडत असून देखील शहरात लॉकडाऊन का होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत होता.

त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज उत्तर दिले आहे, लॉकडाऊन करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने नकार दिलेला असल्याने आता कुठेच लॉकडाऊन होणार नाही. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू हा चांगला पर्याय आहे. नगर शहरात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करायची की नाही, हे जनतेने ठरवावे, त्यास माझा पाठिंबा राहील. याबाबत आ.संग्राम जगताप आणि महापौर बाबासाहेब वाकळे निर्णय घेतील, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता कर्फ्यूचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या कोर्टात ढकलला आहे.

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगरला कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी मुश्रीफ म्हणाले, लॉकडाऊनला केंद्र व राज्य सरकारचा विरोध आहे. त्यामुळे प्रशासन आता लॉकडाऊन करणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू उत्तम पर्याय आहे. मात्र त्यात प्रशासन पुढाकार घेणार नाही. कोल्हापूर, कागल व अन्य ठिकाणी हे प्रयोग जनतेच्या पाठिंब्यावर करण्यात आले आहे. त्यातही काहींचा विरोध असतो. नगरमध्येही जनतेची मागणी असेल तर त्यास माझा पाठिंबा आहे. त्यासाठी नगरचे नेते आणि जनतेने पुढाकार घ्यायला हवा. आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे यासंबंधीचा निर्णय घेतील, असे मुश्रीफ म्हणाले.

यावेळी आ.संग्राम जगताप, आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार आदी उपस्थित होते.