Breaking News

अमृता फडणवीसांनी व्यवहार केल्यास देवेंद्रजींच्या पदाचा गैरवापर होतो का?

 Bad days are far from over for Eknath Khadse

मुंबई : एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीसजी यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का? असा प्रतिप्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विचारला. एमआयडीसी जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ आली, असा दावा फडणवीसांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. 

'देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यापेक्षा जास्त मी संयमी आहे.  संयम पाळला आहे. गेली पाच वर्ष झाली सहन केलं. एमआयडीसी प्रकरणात माझा राजीनामा घेतला, असं म्हणता तर तो कुठल्या कारणासाठी? एमआयडीसीची तथाकथित जी जमीन घेतली, ती एका मुस्लीम व्यक्तीची होती.

2010 पर्यंत त्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर होते, तो उतारा मी दाखवतो. 2010 नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे पाहूनच ती जमीन माझ्या बायकोने, जावयाने खरेदी केली, एकनाथ खडसेने ती जमीन खरेदी केलेली नाही' असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

'जर मी ती जमीन खरेदी केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर मी कसा दोषी? एखाद्या उताऱ्यामध्ये इतर हक्कात कोणाचे नाव असेल, तर तो मालक नाही होऊ शकत. इतकी तर समज माजी मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) असायला पाहिजे. त्यांना वाटत असेल, तर माझी ना नाही. पण मला समजवू तरी द्या' असे आर्जव खडसेंनी केले.

'एक इंचही जमीन मी घेतली नाही'

'एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत' असं खडसे म्हणाले.

'महसूल मंत्री होतो म्हणजे उतारा कसा असतो एवढी तरी अक्कल मला आहे. फडणवीस यांच्या दाव्यानुसार 1971 ला एमआयडीसीने नोटीस काढली होती, की पन्नास वर्षांनी कधीतरी आपल्याला ती जमीन लागणार आहे. पण मूळ मालक एमआयडीसी असेल तर त्यांनी दिलेली भरपाई हवी, कागदपत्रे हवी. पुरावे द्या मी क्षमा मागेन. मंत्र्याच्या नातेवाईकांनी व्यवहार करु नये, असे नियम किंवा कायदे आहेत का?' असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला.  


'भंगाळेला रात्री दीड वाजता का भेटले?

     ''हॅकर मनीष भंगाळेने सांगितले की एकनाथ खडसे यांचे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाले. मग देवेंद्र फडणवीस कृपाशंकर सिंह यांच्यासोबत भंगाळेला रात्री दीड वाजता का भेटले? मी तर फोटो पण दाखवले. हॅकिंग हा गुन्हा आहे, मग सायबर विभागाने त्याच्यावर कारवाई का नाही केली? दाऊद प्रकरणात पक्षाची बदनामी झाल्याने माझा राजीनामा घेतला, असे त्यावेळी मला सांगण्यात आले होते. माझ्या पीएने लाच घेतली, लोकपाल-हायकोर्ट सगळीकडे चौकशी बसवली, मला क्लीन चिट मिळाली, पण नुसते आरोप करायचे, मानसिक त्रास द्यायचा हे कोणाच्या तरी आदेशाने' असा दावाही खडसे यांनी केला.

'तर उभ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहून माफी मागेन…'

'एमआयडीसीने पन्नास वर्षात एक रुपया जरी मला दिला असेल, तर मी दोषी. पण माझी बाजू ऐकलीच नाही, चर्चा करा असं मी पाच वर्ष सांगतोय. मी दोषी असेन तर उभ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहून माफी मागेन, सांगेन मी नालायक आहे, मी भ्रष्ट आहे, मी बदमाश आहे' असेही एकनाथ खडसे म्हणाले.