Breaking News

महाराष्ट्रात कोरोना कहर!

 - गेल्या 24 तासांत सापडले 23,816 नवे रुग्ण; 325 रुग्णांचा मृत्यू 

- पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई, ठाण्यात कोरोनाचे थैमान

Is India Winning The Coronavirus War? The 'R' Factor

मुंबई/ प्रतिनिधी 

कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात भीषण स्वरूप धारण करते आहे. दररोज रुग्णसंख्येचा नवा उच्चांक समोर येतो आहे. गेल्या 24 तासांत 23 हजार 816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचे थैमान पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. राज्यभरात सध्या दोन लाख, 52 हजार 734 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. कुठल्याही दुसर्‍या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत.

पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात पुण्याचा आकडा अव्वल आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे. पुण्याबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोना प्रकोप वाढतो आहे. मुंबई महानगर भागात गेल्या 24 तासांत 2227 रुग्ण दाखल झाले आहे. तर पुण्यात 2340 रुग्ण दिवसभरात सापडले. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे. ठाणे शहरात 495, नवी मुंबईत 391, तर कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासांत तब्बल 785 रुग्ण सापडले आहेत. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा कळस गाठला जात आहे. गेले काही दिवस 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण राज्यात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या पश्‍चिम महाराष्ट्र आणि नागपुरात सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत 13,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 6,86,462 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर पहिल्यांदाच तीनच्या खाली आला आहे. आता महाराष्ट्रात मृत्यूदर 2.87 टक्के एवढा आहे. राज्यात 16,11,280 रुग्ण घरात विलगीकरणामध्येआहेत. 37,644 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाखांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. 


24 तासांत कोरोनानं मोडले सर्व रेकॉर्ड! 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

--------------