Breaking News

एका सुरेल पर्वाचा अस्त!

प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधनचेन्नई/ प्रतिनिधी

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 74 व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेल्या चोवीस तासांत त्यांची प्रकृती अचानक खालावली. अखेर शुक्रवारी  त्यांची प्राणज्योत मालवली. देश एका दिग्गज गायकाला मुकला आहे. 

एसपी उर्फ श्रीपथी पंडितराधुयुला बालसुब्रमण्यम यांचा जन्म तेलुगु ब्राम्हण कुटुंबात 4 जून 1946 साली झाला होता. आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात त्यांचे मूळ गाव आहे. 1966 मध्ये आलेल्या श्री श्री मर्याधा रमन्ना या तेलुगु चित्रपटातील पार्श्‍वगायनातून त्यांनी गायन क्षेत्रात पर्दापण केले होते. हिंदीसह एकूण 16 प्रादेशिक भाषांत त्यांनी गायन केले असून, 40 हजार गीतांचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एसपी बालसुब्रमण्यम यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी अधिकृत माहिती दिली. शुक्रवारी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची बातमी चरण यांनी दिली. एसपी चरण यांनी डॉक्टर, हितचिंतक आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणार्‍या सर्वांचे आभार मानले आहेत. सकाळी प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती 90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केले होते. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केले होते. सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्‍वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आले आहे. एसपी यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. यात भारताला त्यांची ओळख पटली ती हमसे है मुकाबला या सिनेमातून. यात त्यांनी प्रभूदेवाच्या भावाची भूमिका केली होती.