Breaking News

देशातील कोरोनाबाधितांच्या दररोजच्या आकड्यात तुलनेने घट. नवी दिल्ली । देशात एकीकडे कोरोनाबाधितांचा दरदिवशी वाढणारा आकडा मोठा आहे. तर दुसरीकडे रिकव्हरी रेटसुद्धा चांगला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी (२४ सप्टेंबर) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ५९६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामळे, देशात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५७ लाखांच्या पार गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सद्यस्थितीत ९ लाख ६६ हजार ३८२ रुग्ण विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत. तर गेल्या २४ तासांत १ हजार १२९ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या ९१ हजार १४९ वर पोहोचली आहे.

दिलासादायक बाब ही की, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज थेट ९० - ९५ हजारांहूनही अधिक वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा आता काहीसा कमी झालेला दिसतो.