Breaking News

औषध फवारणीच्या नावाखाली पाण्याचे सडे मारणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये: सूर्यभान कोळपे

औषध फवारणीच्या नावाखाली पाण्याचे सडे मारणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये: सूर्यभान कोळपे


   कोपरगाव प्रतिनिधी - जागतिक कोरोना संकटात मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळे इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. मात्र चर्चेत राहण्यासाठी ज्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळून औषध फवारणीच्या नावाखाली सर्रासपणे पाण्याचे सडे मारले त्यांनी शहाणपणा शिकवू नये असा टोला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे यांनी तालुक्याच्या पूर्वेकडील साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.
              तालुक्याच्या पूर्वेकडील साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन यांनी आ.आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेचा सूर्यभान कोळपे यांनी चांगलाच समाचार घेतांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की, ज्यावेळी कोपरगाव शहरात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासुन आमदार आशुतोष काळे सातत्याने प्रशासनाशी संपर्क ठेवून होते व आजही आहे. कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाला व प्रशासनाला येणाऱ्या अडचणी त्यांनी तातडीने सोडविल्या. त्यामुळे काही  तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असतांना देखील कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या नगण्य होती. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या. थांबलेल्या अर्थचक्राची गाडी पुन्हा रुळावर यावी यासाठी जून महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये शासनाच्या वतीने घालण्यात आलेल्या अटी शिथिल करून अनलॉक सुरु झाले. व टप्या टप्प्याने बहुतांश निर्बध शिथिल केल्यापासून राज्यात व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली व दुर्दैवाने कोपरगाव तालुक्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र याचे कुणी राजकारण करीत असेल तर ते अत्यंत चुकीचे असून तालुक्यातील जनतेचे दुर्दैव आहे. अशा जीवघेण्या संकटकाळी सामुहिकपणे या संकटाचा मुकाबला करायचा सोडून आपली राजकीय पोळी शेकून घेणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
               आज कोपरगाव शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून यामध्ये आपल्या उद्योगसमूहाचे देखील कर्मचारी आहेत याचे भान ठेवावे. मागील महिन्यात काही दिवस तर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आपल्या उद्योग समुहातील बाधित रुग्णाच्या संख्येने केलेल्या उच्चांकाचा तुम्हाला विसर पडला का? एकाच दिवशी सापडलेल्या ६५ रुग्णांपैकी आपल्या संजीवनी उद्योग समूहातील जवळपास ४२ रुग्ण होते. याचा तुम्हाला विसर पडू शकतो मात्र जनता विसरणार नाही. कोरोना संकटाचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यात पहिली बैठक घेवून उपाय योजना करणारे आ.आशुतोष काळे एकमेव असून तालुक्याच्या जनतेची काळजी घेण्यासाठी ते समर्थ आहेत. याउलट या जीवघेण्या संकटात फक्त मार्च महिन्यातच खोटा देखावा करणाऱ्या आपल्या नेतृत्वाचे योगदान काय? असा प्रश्न आपण आपल्या नेत्यांना अगोदर विचारावा व नंतर आमदार आशुतोष काळे यांच्यावर बोलावे. आपला निष्काळजीपणा आपल्या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतला आहे त्यामुळे आपण जर आपल्या उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांचीच चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर बरे होईल. ज्याप्रमाणे कोपरगाव शहरात औषध फवारणीच्या नावाखाली पाण्याचा सडा मारला तसे कृत्य आपल्या उद्योग समुहात करू नका. तालुक्याच्या जनतेची खोटी काळजी करण्यापेक्षा आपल्या उद्योगसमुहातील कर्मचाऱ्यांची जबाबदारीने काळजी घ्या. आमदार आशुतोष काळे मागील सात महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता सातत्याने जनतेसोबत आहे. एकही दिवस घरी न थांबता जनतेच्या आरोग्याबरोबरच मतदार संघाच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करीत आहे. मात्र काही व्यक्तींना न फिरता देखील कोरोनाची बाधा होत आहे त्यांची पण काळजी घ्या. राजकारण करण्यासाठी दुसरे मुद्दे शोधा पण या महामारीचे राजकारण करू नका असा सल्ला सूर्यभान कोळपे यांनी तालुक्याच्या पूर्वेकडील साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन यांना दिला आहे.
                प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्या महत्वाची भूमिका बजावीत आहे. संजीवनीने देखील अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले आहे तरीही कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे औषध (पाण्याची) फवारणी प्रमाणे या नागरिकांना वाटण्यात आलेल्या गोळ्यातरी खऱ्या वाटल्या का? याबाबत शंका वाटते.