Breaking News

इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही, मग महाराष्ट्रातच का?

- उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद

- राजकारणापलिकडे जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू!

Maharashtra CM Uddhav Thackeray praised for handling of COVID-19 crisis

मुंबई/ प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडलेले नाही. राज्य सरकार मराठा बांधवांच्या सोबतच आहे, अशी हमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही, मग महाराष्ट्रातच का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कोरोना, शेती, मराठा आरक्षण, राजकारण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते, तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होते. मात्र विधिमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी बहुमताने नाही, तर एकमताने निर्णय घेतला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, ते आव्हान आपण जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. पण पहिल्या सरकारचे वकील आपण बदललेले नाहीत, उलट नवे वकीलही नियुक्त केले, ज्या-ज्या सूचना मिळत गेल्या त्यांचे पालन केले. राज्य सरकार म्हणून आपण कोर्टात कमी पडलो नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मोठ्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मानली, पण ते करताना अनाकलनीय पद्धतीने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात तशी दिल्याचे माझ्या माहितीत नाही, पण गरज नव्हती ती स्थगिती दिली. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आता कोणासमोर काय आणि कशा पद्धतीने गार्‍हाणे मांडायचे याचा आम्ही अभ्यास करत आहोत, विरोधीपक्ष नेत्यांशी मी फोनवर बोललो, ते सध्या बिहारला आहेत, पण त्यांनीही आपण सोबत असल्याची हमी दिली. इथे राजकारण हा मुद्दा नाही. त्यामुळे मराठा बांधवांनो, तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. आंदोलन जरुर करा, पण केव्हा? सरकार दाद देत नसेल तर आंदोलन करा, विनाकारण उद्रेक कशासाठी करता? आपण एकत्र आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.