Breaking News

एटीएम मशिनमधून पैसे काढून देतो असा बहाणा करुन फसविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी केले गजाआड !

एटीएम मशिनमधून पैसे काढून देतो असा बहाणा करुन फसविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी केले गजाआड !
-------------
पोलिस हवालदार बाळकृष्ण ठोंबरेंवर कौतुकाचा वर्षाव !

नेवासा तालुका प्रतिनिधी :
      नेवासा फाटा येथे एटीएम मशिनवर पैसे काढण्यास येणाऱ्या आडाणी लोकांना मदतीचा बहाणा करुन त्यांना एटीएमवरुन पैसे काढून दिल्यानंतर दुसरेच बनावट एटीएम कार्ड त्यांच्या हातात देवून भोळ्या - भाबड्या लोकांचे पैसे काढून ठकविणाऱ्या भामट्याला नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बाळकृष्ण ठोंबरे, पो.कॉ रवी पवार यांनी सापळा रचून मुद्देमालासह गजाआड करण्यात यश आले या भामट्याला पोलिस पकडत असतांना भामट्याची व पोलिसांची चांगलीच झटापट झाली शेवटी त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडून जेरबंद करण्यात नेवासा पोलिसांना अखेर यश आले. ही घटना शनिवार (दि.२६) रोजी चार वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळील राजमुद्रा चौकात घडली.
   याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, पुंडलिक जालिंदर लष्करे (रा.पावन गणपती जवळ) नेवासा खुर्द, हे इसम नेवासा फाटा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएमजवळ बजाज कंपणीच्या लालकाळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल (क्रमांक एम.एच २१ बी.बी.४०६७) वरुन सनिदेवल विष्णू चव्हाण,वय २१, (रा.मुद्येश वडगांव ता.गंगापूर.जि.औरंगाबाद) हा भामटा येथे आला व लष्करे यांना म्हणाला पैसे निघत नाहीत का ? मी पैसे काढून देतो असे म्हणून या भामट्याने लष्करे यांच्याकडील एटीएम घेवून पैसे काढण्यासाठी घेतलेले कार्ड स्वतः जवळ ठेवून दुसरेच बनावट एटीएम कार्ड भामट्याने लष्करे यांना हवाली करुन २६ हजार ५०० रुपये काढून घेवून फसवणूक केल्याची घटना घडली होती.
   या घटनेची माहीती नेवासा पोलिस ठाण्याचे हवालदार बाळकृष्ण ठोंबरे व पो.कॉ.रवी पवार यांना समजताच आरोपीच्या शोधासाठी शनिवारी दुपार पासूनच टेहाळणी सुरु केली असता चार वाजता राजमुद्रा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या एटीएम जवळ पैसे काढणाऱ्या लोकांशी संपर्क करीत असलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिस हवालदार ठोंबरे व पवार यांनी सापळा रचत धाड टाकली असता संशयित आरोपी व पोलिसांची चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी हिसका देत असतांना सैन्य दलातील मेजर ज्ञानदेव बर्डे व ग्रामस्थांनी पोलिसांना मदत करत आरोपीला पकडून नेवासा पोलिसांनी या भामट्याला जेरबंद केले असता त्याच्याकडून ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल वसूल केला त्यामध्ये महाराष्ट्र बँकेचे एक एटीएम कार्ड,स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे ८, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे २, बंधन बँकेचे १, अॅक्सीस बँकेचे १, असे मिळून एकूण ९ एटीएम कार्ड व पल्सर मोटारसायकलच्या नंबर व चासीची खाडाखोड केलेली एक मोटारसायकल असा मिळून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन भामटा सनिदेवल विष्णू चव्हाण (वय २१) रा.मुद्येश वडगांव ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद याला अटक करण्यात नेवासा पोलिसांना यश आले.
   नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बाळकृष्ण ठोंबरे व पो.कॉ.रवी पवार व सैन्य दलातील मेजर ज्ञानदेव बर्डे यांनी आरोपीशी झटापट करुन त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडून अटक केल्यामुळे उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ.मंदार जवळे,नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रणजित डेरे व ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतूक करुन चांगल्या कामाची प्रसंशा करत कौतुकाची थाप पोलिस हवालदार ठोंबरे व सैन्य दलातील मेजर ज्ञानदेव बर्डे यांना दिली.