Breaking News

गुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन !

गुरुवारपासून काँग्रेसचे नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन


नेवासा तालुका प्रतिनिधी -
    नेवासा व शनिशिंगणापूर पोलिसांवरील गंभीर स्वरूपाच्या आरोपांसदर्भात सखोल चौकशी व कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा निषेधार्थ नेवासा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार दि.10 सप्टेंबर पासून नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

    यासंदर्भात गेल्या दि.27 ऑगस्ट रोजी शेवगावच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील नेवासा तसेच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात नेवासा पोलिसांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या राहत्या घराची विनाकारण झडती घेऊन त्यांची समाजात बदनामी होईल असे जाणूनबुजून केलेले कृत्य, मावा तंबाखू व्यापाऱ्यावर छापा घालून कारवाई न करता केलेली आर्थिक तडजोड तसेच शनिशिंगणापूर पोलिसांनी किराणा दुकानदाराच्या तरुण मुलास ओलीस धरून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गंभीर तक्रारी आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करून लक्ष वेधूनही काहीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. शेवगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी अत्यंत धीम्या गतीने करून संबंधित आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना बचाव करण्यासाठी पुरावे नष्ट करण्यास वाव मिळवून दिल्याचा त्यांचा सडेतोड आरोप आहे. 

    कर्तव्य बजावण्यात कसूर करून 'गोरख धंदे' करण्यात तालुक्यातील पोलीस कर्मचारी गुंतल्याने तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती नाजूक बनल्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. तालुक्यात 'गाव तिथे अवैध धंदे' अशी चिंताजनक परिस्थिती बनली असून चोऱ्या दरोड्याचा घटनांत वाढ होऊनही तपास लागणे मुश्किल बनल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तालुक्यातील अवैध धंदयांचा बंदोबस्तअसो की चोऱ्या दरोड्यांचा तपास असो, तालुक्यातील पोलिसांना त्यात सपशेल अपयश येत असल्याने त्यासाठी वारंवार नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वारंवार मदत घेण्याची नामुष्की ओढवत असल्याची त्यांची तक्रार आहे. कर्तव्य विसरून भलतेच उद्योग करण्याची सवय काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागलेली असल्याने सर्वसामान्य जनतेत पोलीस दलाविषयी चुकीचा संदेश जाऊन त्यांचा या यंत्रणेवरील विश्वास ढळू लागल्याची चिंताजनक बाब याद्वारे निदर्शनास आणून देण्यात आली आहे. 

    वरिष्ठांकडून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाऊन अभय दिले जात असल्याची भावना बळावल्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी आमरण उपोषण व धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंब करावा लागत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी दिली आहे.