Breaking News

ऑडीटर्स कौन्सीलच्या अध्यक्षपदी रामदास शिर्के तर विश्‍वस्त पदी अकोल्याचे बी. एल. देशमुख !

ऑडीटर्स कौन्सीलच्या अध्यक्षपदी रामदास शिर्के तर विश्‍वस्त पदी अकोल्याचे बी. एल. देशमुख !


अकोले/ प्रतिनिधी - 
राज्यातील ऑडीटर्स ची नुकतीच ऑडीटर्स कौन्सिल अ‍ॅन्ड वेलफेअर असोशिएशन स्थापन झाली असुन, संस्थेच्या विश्‍वस्तपदी अकोल्याचे प्रथितयश लेखापरीक्षक बी.एल.देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. श्री. देशमुख यांचेसह नवनिर्वाचित कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रमाणित लेखापरीक्षक व धर्मदाय विभागाचे लेखापरीक्षक यांना लेखापरीक्षणाचे कामकाज करतांना येणार्‍या विविध अडचणीची सोडवणुक करण्यासाठी रामदास शिर्के यांच्या पुढाकाराने ऑडीटर्स कौन्सिल अ‍ॅन्ड वेलफेअर असोशिएशन ची स्थापना करण्यात आली. याद्वारे विविध माहिती सत्रांचे आयोजन करणे, लेखापरीक्षकांच्या अडचणींची सोडवणुक करणे अशा स्वरूपाचे कामकाज केले जाणार असल्याचे असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष रामदास शिर्के यांनी सांगितले.

ऑडीटर्स कौन्सिल अ‍ॅन्ड वेलफेअर असोशिएशन चा शुभारंभ नुकताच निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव स.प. व वि. मंत्रालय, मुंबई चे अ‍ॅड. एस.बी. पाटील यांच्या हस्ते गुगल मिटद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी निवृत्त शासकीय लेखापरीक्षक अ‍ॅड. खरात यांचेसह अ‍ॅड. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्यास राज्यातील 90 लेखापरीक्षक सहभागी झाले होते. ऑडीटर्स कौन्सिल अ‍ॅन्ड वेलफेअर असोशिएशन चे नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे - अध्यक्ष रामदास शिर्के (पुणे), उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख (औरंगाबाद), सचिव उमेश देवकर (अहमदनगर), सह-सचिव दत्तात्रय पवार (खंडाळा-सातारा), खजिनदार संदिप नगरकर (नाशिक), तर विश्‍वस्त म्हणून संजय घोलप (कराड-सातारा), बाळासाहेब देशमुख (अकोले-अ.नगर), श्रीकांत चौगुले (कोल्हापुर), बाळासाहेब वाघ (बारामती-पुणे)

शिर्के पुढे म्हणाले कि महाराष्ट्रात सुमारे 2 लाख सहकारी संस्था व धर्मदाय विभागाअंतर्गत सुमारे 4 लाख संस्था नोंदणीकृत आहेत. तर सहकार क्षेत्रात 11 हजार 640 तर धर्मदाय विभागाकडे 800 लेखापरीक्षक कार्यरत आहेत. दोन्हीही ठिकाणी कामकाजात सुसूत्रता असणे आवश्यक आहे. भविष्यात भरपुर आवाहने आमच्या समोर आहेत. दोन्ही विभागाचे लेखापरीक्षक यांना कायदेशिररित्या भक्कम स्थान निर्माण करणे व सर्वांना मदत करणे, राज्यातील लेखापरीक्षकांचे संघटन करणे, जिल्हा स्तरीय त्रिस्तरीय समित्यांची स्थापना करणे, सहकार व धर्मदाय विभागात संघटनच्या माध्यमातुन भरीव काम करणे या विचाराने व ध्येयाने आम्ही सर्व लेखापरीक्षक एकत्र आलो आहोत. व हे काम सामुहिक ताकतीने पुढे नेण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
-----