Breaking News

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन

 - ओबीसी समाजाचा इशारा 

पुणे/ प्रतिनिधी 

मराठा समाजाला शिक्षण तसेच नोकरीत आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, हे आरक्षण अन्य मागासवर्गीय कोट्यातून (ओबीसी) दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी यावर मूक भूमिका घेतल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारादेखील ओबीसी संघर्ष सेनेने दिला आहे.

या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके, रामदास सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य गुरव संघटनेचे प्रताप गुरव, माळी महासंघाचे आनंदा कुदळे उपस्थित होते. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52 टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधव आंदोलन करतील, असे या नेत्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना ओबीसी आरक्षणातून कोटा देण्याची मागणी मराठा समाजाच्या अनेक संघटनांकडून  केली जात आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य असून, ओबीसींवर अन्याय करणारी आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि प्रशासनाला सविस्तर निवेदन पाठवले जाणार असल्याचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काही मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन करीत 52 टक्के असलेला ओबीसी समाज समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितले आहे. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय झाला, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय झाला असला, तरी 52 टक्के ओबीसींसाठी या विषयाची चर्चा करणे गरजेचे आहे. मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले. ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळाला निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळावा; पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय करू नये, इतकीच आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.