Breaking News

आमदार सुमन पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह !

मुलापाठोपाठ आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांना देखील कोरोनाची लागण

 सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यापाठोपाठ आबांची पत्नी अर्थात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. 

आबांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादीकडून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील या दोघांचे कोरोना अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आले होते. त्यावेळी सुमनताई पाटील यांची स्वॅब तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र काल (शनिवारी) रात्री उशिरा आलेल्या त्यांच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

रोहित पाटील आणि सुरेश पाटील या दोघांनाही उपचारासाठी सुरुवातीला सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी तिघांनाही उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले आहे. आमदार सुमन पाटील यांच्यासह तिघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने सुमन पाटील यांना तिकीट दिले होते. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि त्या पुन्हा आमदारपदी निवडून आल्या.