Breaking News

पुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार !


पुणे :

 पुण्यात आजपासून सायंकाळी 7 नंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे आता पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पार्सल सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी सायंकाळी 7 वाजता हॉटेल बंद करण्याची आता आवश्यकता नाही, तर ते रात्री 10 पर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवू शकतील, असं पालिकेने सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या पार्सल सेवेत वाढ करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

'हॉटेल, रेस्टॉरंटमधून सध्या पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण तेवढी पुरेशी नाही. रेस्टॉरंट व्यावसायिाकंना यातून उत्पन्न मिळत नाही. मुंबईसह राज्यात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिकांचे संसार अवलंबून आहेत. तसेच फिरतीवर असलेल्या नागरिकांसाठी रेस्टॉरंटमधील जेवण गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात हॉटेल पूर्णपणे बंद होती. त्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात रेस्टॉरंट जेवणासाठी खुली करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करावी, अन्यथा 40 टक्के रेस्टॉरंट बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे', असं आमदार शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यवसायांना संध्याकाळी 7 पर्यंतच पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. पण या वेळेत आता वाढ करुन ती रात्री 10 पर्यंत करण्यात आली आहे.