Breaking News

बँकाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित

 

परभणी । जिंतूर शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया बँकेच्या भोंगळ कारभारामूळे ग्रामीण भागातील शेतकरी पीक कर्जासाठी हैराण झाले आहेत. शहरातील दोन्ही शाखेसमोर सकाळपासूनच शेतकरी पीक कर्जासाठी रांगा लावत आहेत. दिवसभर ताटकळत उभे राहून नंबर येत नसल्याने हे शेतकरी घरी जाण्याऐवजी चक्क रात्री मुक्कामी बँके समोरच ठाण मांडून बसले आहेत. सकाळी बँक सुरू होताच पुन्हा कर्जासाठी नंबर लावली जात आहेत.

जिंतूर तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. दररोज बँकेकडे चकरा मारून पीककर्ज मिळत नसल्याने हैराण झालेले शेतकरी आता चक्क बँकेसमोर मुक्कामी राहत आहेत. बँकेकडून दररोज पन्नास शेतकऱ्यांनाच बोलावले जात आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कर्ज मिळविण्यासाठी बँकेकडे चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अद्यापही कर्ज मिळाले नाही. बँकेकडून बुधवार गुरुवार शुक्रवार या तीन दिवसात पीक कर्जाच्या फाईल जमा करण्यात येतात.

मात्र आपला नंबर लागावा यासाठी मंगळवारी रात्रीच शेतकऱ्यांनी बँकेसमोर रांगा लावत चक्क मुक्काम ठोकला आहे. बँकेकडून केवळ 50 शेतकऱ्यांच्या फाईली जमा केल्या जात आहेत. मात्र बँकेसमोर हजारोंच्या संख्येने शेतकरी ताटकळत उभे राहत आहेत उर्वरित शेतकऱ्यांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित करीत बँकेसमोर जाता मुक्काम करून कर्ज पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेतीत काम करायची की बँकेसमोर कर्जासाठी रांगा लावायच्या असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सध्या कोरोना संसर्गाची गंभीर स्थिती असतानाही, शेतकरी मोठ्या संख्येने बँकेसमोर रांगा लावत आहेत याकडे आता जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.