Breaking News

शिवसेनेची 'सोनिया सेना', कंगनाचे शरसंधान !

 Kangana calls Uddhav Thackeray a sample of dynasty, drags Sonia Gandhi into  the ongoing controversy

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची 'सोनिया सेना' झाली आहे, अशी कडवट टीका अभिनेत्री कंगना रनौतने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत संबोधत आव्हान देऊन अवघे काही तास उलटले नाहीत, तोच कंगनाने पुन्हा शरसंधान साधले आहे. 'श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची 'सोनिया सेना' झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका' असे ट्वीट कंगनाने केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरुन कंगनाने निशाणा साधला.

 

कंगना उद्धव ठाकरेंना काय म्हणाली?

'उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा सूड उगवलात. आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल.' अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती.

'ही वेळेची किमया आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी वेळेचं चक्र सारखंच राहत नाही. आता मला वाटतं की, तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. कारण मला माहित होतं की काश्मिरी पंडितांवर काय बेतलं असेल, आज मी त्याचा अनुभव घेतला आहे.' असंही कंगना म्हणाली होती.

'मी या देशाला आज वचन देते, मी फक्त अयोध्येवरच नाही, तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेन. त्यातून देशावासियांचे प्रबोधन करेन. कारण मला माहिती होतं, की हे होणार. माझ्यासोबत जे झालं त्याची काही कारणं आहेत, काही पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे हे क्रौर्य, ही दहशत आहे. बरं झालं हे माझ्यासोबत घडलं. याच्यामागे काही कारणं आहेत.' असे कंगना शेवटी म्हणाली.

उद्धव ठाकरेंचा टोला

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रनौतला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता. 'अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत.' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक प्रस्तावावेळी म्हणाले होते.