Breaking News

धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा !

 


मुंबई : धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याला आहे, अशी भूमिका OBC नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली. 

'ओबीसी समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमीच केली. मराठा समाजाला एससीबीसीमध्ये घालण्याचं षडयंत्र झालं आहे. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही, ही कल्पना पूर्वीच होती आणि तेच घडलं. ओबीसी आणि मराठ्यांचा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता यापूर्वीही होती, जे सांगितलं तेच घडलं' असं शेंडगे पत्रकार परिषदेत म्हणाले.

'आता मराठ्यांना आरक्षण कुठून देणार, हे कुणालाच ठाऊक नाही, मार्ग निघणं कठीण आहे. आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसीला आहे, त्यांनी भटक्या, मुक्तांचं आरक्षण मागू नये. ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, हे सांगण्याचा घाट काही मराठा संघटनांनी घातला आहे. ओबीसीच्या कणभर आरक्षणालाही धक्का लागणार नाही, असा कायदा आहे. पण काही मराठा नेता प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत, हे साफ चूक आहे. ओबीसीचं आरक्षण मिळणं गरजेचं आहे. अन्यथा कठोर निर्णय घ्यावा लागेल' असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिला.

'धनगर समाजाचा 1000 कोटीचा निधी दिला नाही. ओबीसीसाठी राखीव 50 टक्के निधी आम्हाला मिळायला हवा. शरद पवारांनी सांगितलं की अध्यादेश काढा आणि वाद मिटवा. शरद पवार यांनी सुचवलेला मार्ग योग्य आहे. धनगर समाजासाठी अध्यादेश काढा, अशी आम्ही मागणी करतोय. धनगर समाजासाठी अध्यादेश का निघत नाही हा प्रश्न आहे' असेही ते म्हणाले.

'धनगर समाजासाठी सहा आणि ओबीसी समाजासाठी 74 हॉस्टेलची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र अद्याप एकही हॉस्टेल सुरु झालेलं नाही. जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला, तर मोठा संघर्ष होईल. मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मिळावे, ही भूमिका घेऊ नये' असे आवाहनही प्रकाश शेंडगे यांनी केले.