Breaking News

समाजकारणातील सोंगाडे !

 समाजकारणातील सोंगाडे!

शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो.ज्ञान आणि माहितीतील अंतर समजते.समज गैरसमज यातील फरक समजून निर्णय घेणे सोपे जाते.अशी एक धारणा आहे.अर्थात ही धारणा अगदीच फालतू नाही.शंभर टक्के खरीही नाही.आपल्या आजुबाजूला शिकले सवरलेले असे अनेक विद्वान अशी सोंगाडेगीरी करू लागतात तेंव्हा कागदी पुंगळ्या मिरवणाऱ्या तथाकथीत सुशिक्षीत मंडळींच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उभे रहाते.

 बारा बलुतेदारामध्ये कुणीही स्वंयघोषीत नेता नाही. बाराबलुतेदार समाज कोणाचाही दिशाभूल करीत नाही.औबीसीतील प्रबळ जातीबांधवाना आम्ही मोठे भाऊ मानतो. मोठ्या भावाने आम्हाला सावत्रपणाची वागणूक देऊ नये अशी अपेक्षा मायक्रो ओबीसी समाजबांधव व्यक्त करू लागले आहेत.त्याचे कारण समाजकारणातील सोंगाडेगीरी हेच आहे. रोहिणी आयोग फालतु असे जे वक्तव्य एका वृत्त वाहिनीवर झाले ते बाराबलुतेदारांना अजिबात आवडले नाही.  

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे.शिक्षणाच्या मोठमोठ्या पदव्या घेऊन प्राध्यापक बिरूद लावल्यानंतर एव्हढीही समज येत नसेल तर या माणसाला प्राध्यापक कुणी केले हा प्रश्न कुणीतरी विचारणारच ना? अशा प्रवृत्ती दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःच स्वतःची वाट  केव्हा लावतात  हे कळत देखील नाही.सध्या असाच एक समाज पुढारी महाराष्ट्रात आपली अक्कल पाजाळून सामाजिक सलोख्याच्या नरडीला घोट लावून आपले पुढारपण त्या धगीवर शेकवू पहात आहे.

सध्या महाराष्ट्रातील समाजकारणात आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे.आज आरक्षण चळवळीचा अभ्यास असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जाणकार समाज नेत्यांचा अपवाद वगळला तर अनेक हौशे गवशे नवसे अकलेचे तारे तोडून समाजकारणाचा विचका करू लागले आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च स्थगिती मिळाल्यानंतर या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी मराठा समाज आपल्या पातळीवर प्रयात्नांची पराकाष्ठा करीत असतांना कुठलाही संबंध नसताना ओबीसी चळवळीतील काही  स्वयंघोषीत विदुषक पुढारी मध्ये तोंड मारून वादाला वाट मोकळी करून देण्याचा फाजीलपणा करीत आहेत.स्वतःच्या नावासमोर प्राध्यापकाचे बिरूद लावून उचलेगीरी करणारे स्वयंसिध्द लेखक म्हणवणाऱ्या या महाशयांचा एकूणच सामाजिक चळवळीचा अभ्यास किती? हा खरे तर संशोधनाचा विषय ठरू शकतो.असो,समाजाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही,पण आपले अर्धवट ज्ञान पाजळून जातीजातीत भांडणे लावण्याचे धंदे  या अर्ध विद्वानांनी थांबवावे म्हणून दखल घेण्याची वेळ आली आहे.

  ओबीसी चळवळीचे नेते म्हणवून घेणारे अवघ्या समाजाचे नेते आहेत की तमाशाच्या फडातील सोंगाडे हा प्रश्न त्यांचे एकूण प्रवचन ऐकल्यानंतर कुणाही सामान्य माणसाला पडल्याशिवाय रहात नाही.माझा माईक आणि माझेच ऐक अशा अविर्भावात बरळतांना आपण एखाद्या वृत्तवाहीनीवर बोलत आहोत.आपले म्हणणे सारे जग ऐकत आहे.भाषा ज्ञानाने परिपुर्णा नसाली तरी शालीन असायला हवी,आपली शब्दफेक उपहास करणारी नसावी!आपल्या शाब्दिक उपहासाने एखाद्या समाजाच्या भावनांवर आघात होणार नाही ,एव्हढ भान तरी ठेवायला हवे की नको.

आपण प्रतिनिधी म्हणून जेंव्हा बोलत असतो तेंव्हा ते तुमचे व्यक्तीगत विचार नसतात तर आपण ज्याचे प्रतिनिधी म्हणून चर्चेला बसलो आहोत त्या समाज घटकाची इभ्रत आपल्यामुळे लिलावात निघणार नाही याची जबाबदारी त्या बोलणाऱ्या व्यक्तीमत्वावर असते किंबहूना ती त्यांनी स्वीकारायला हवी.आपले विदुषकी चाळे आपल्या समाजघटकाच्या संस्कृतीला बाधक ठरू शकतात.याची जाणीव या विद्वानांनी ठेवायला हवी.

  विद्यमान समाजकारणात असाच एक कथीत विद्वान स्वतःला सकल ओबीसी चळवळीची नेता समजू लागला आहे.मराठी वृत्तवाहीन्यांवर आपले तत्वज्ञान पाजळतांना बहुजन समाजातील अन्य समाजघटकांना तुच्छ लेखण्याची एकही संधी हे महाभाग सोडतांना दिसत नाही.संदर्भासहीत चर्चा करण्याऐवजी उपहासी शब्दांचा खेळ करून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यातच स्वारास्य दाखवणारे महाशय एव्हढे उत्साहीत होतात की जाणीवपुर्वक आपण न्यायव्यवस्थेचाही अवमान करीत आहोत याचेही भान या विद्वानांना रहात नाही.रोहीणी आयोग फालतू आहे,फालतू आहे तो रोहीणी आयोग असे वक्तव्य करणारे हे विद्वान ओबीसी समाजाचे नेते कसे असू शकतात? असा सवाल ओबीसी चळवळीतील मायक्रो ओबीसीमधून विचारला जातोय.आपण ओबीसी चळवळीत काम करतांना मायक्रो ओबीसीसाठी आपले योगदान काय? ओबुसीतील दबंग जातीच्या बाहेर जाऊन काय परिस्थिती आहे याचा अभ्यास आपण केला आहे का? रोहिणी आयोगावर आपली एव्हढी नाराजी का आहे? याची उत्तरे या महाशयांनी देण्याचा प्रयत्न तरी कधी केला आहे का? 

रोहीणी आयोगाच्या कार्यशैलीबाबत,हेतूबाबत किंबहूना दिलेल्या शिफारशींबाबत मतभेद असू शकतात.पण या आयोग्याच्या अध्यक्षा दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमुर्ती आहेत.आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांना सध्या प्रोटोकाल आहे.मग या आयोगाला फालतू म्हणणे कुठल्या संस्कारात बसते? आपल्या प्राध्यापकीपर्यंतच्या शिक्षणात एव्हढे संस्कारही आपल्यावर झाले नाहीत का? आपला तो बाळा आणि मायक्रो ओबीसी ते कार्ट ही मती आता फार काळ ओबीसी समाज आपल्या डोक्यावर नाचवून घेणार नाही. तुर्तास इतकेच.