Breaking News

किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात मुंबई : वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. वरळीतील गोमाता एसआरएमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीच्या नावाखाली बळकावला आहे. पेडणेकर यांनी एसआरए योजनेअंतर्गत गोमाता जनता सोसायटीमधील केवळ ऑफिसच नाही तर फ्लॅटही लाटला. त्यांच्या कुटुंबाच्या किश कॉर्पोरेट कंपनीने तळमजल्यावर सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जागा लाटली, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आज किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेसमोर आंदोलन केले, महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलनकर्त्यांसह किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे दिलेल्या कागदपत्रात त्यांचा पत्ता आणि कॉर्पोरेट कंपनीचा पत्ताही एसआरएमधील इमारतीतला आहे. याबाबत माझ्याकडे सगळे कागदपत्रे आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.किरीट सोमय्यांचे महापौर किशोरी पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या महापालिका कार्यालयात पोहोचले. अंगावर निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध त्यांनी केला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पुरावे दिल्याचा दावा करत किरीट सोमय्या यांची महापौरांवर कारवाईची मागणी केली आहे.