Breaking News

बाबरीकांडातील आरोपी निर्दोष सुटले!

 बाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित कट नाही : न्यायालय- विशेष सीबीआय न्यायालयाने दिला अंतिम फैसला

- या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार : ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड

- राम मंदिराच्या भूमिपूजनावेळीच बाबरी खटला संपला होता; शिवसेनेकडून अडवाणी, जोशींचे अभिनंदन

लखनऊ/ प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांनी लखनऊतील विशेष न्यायालयात आपला निर्णय दिला. यावेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत 18 आरोपी न्यायालयात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी तब्बल दोन हजार पानांचा निकाल न्यायालयात वाचण्यात आला. न्यायालयाने यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.


बाबरी मशीद जादुने पडली काय : ओवेसी

नवी दिल्ली । 28 वर्षांपूर्वी घडलेल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी बुधवारी सीबीआय विशेष न्यायालयाने निकाल सुनावला. मात्र एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत बाबरी मशीद जादुने पडली काय? असा सवाल उपस्थित केला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, असा निकाल देत सीबीआय विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या पार्श्‍वभूमीवर प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी सीबीआय न्यायालयाने दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करत  भारतातील मुस्लिमांना न्याय मिळाला नाही. असा आरोप त्यांनी यावेळी केला. 


या खटल्यात सीबीआयने 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केले होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या खटल्यात भाजपनेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी यांच्यासह एकूण 48 आरोपी होते. त्यापैकी 16 जणांचे नंतर निधन झालेले आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. के.  यादव यांनी 16 सप्टेंबरला उर्वरित सर्व 32 आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश होता. हे सर्व आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले. 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले, मात्र त्यापैकी 16 जण खटला सुरु असताना मरण पावले. 16 व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. अडवाणी 24 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण 100 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील झफरयाब जिलानी यांनी दिली. या सर्वप्रकरणातील पुराव्यांकडे न्यायालयाने दुर्लक्ष केले आणि खटल्यातील सर्व आरोपींची मुक्तता केली, असे जिलानी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राममंदिराच्या भूमिपूजनावेळीच बाबरी खटला संपला होता. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचे अभिनंदन केले. आम्हाला हाच निर्णय अपेक्षित होता. सीबीआयच्या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत करतो, असे राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


सीबीआय न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे - 

- मशीद पाडण्याची घटना अचानक झाली होती. 6 डिसेंबर 1992 ला दुपारी 12 वाजता मशिदीच्या मागून दगडफेक सुरू झाली. अशोक सिंगल ढांचा सुरक्षित ठेवू इच्छित होते कारण तेथे मूर्ती होत्या.

- कारसेवकांनी दोन्ही हात व्यस्त ठेवण्यासाठी फक्त पाणी आणि फुले आणण्यास सांगितले होते.

- वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना पुरावा मानू शकत नाही.

- फोटोंच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येऊ शकत नाही.