Breaking News

शिव-शंभूप्रेमींच्या लढ्याला यश, संभाजी बिडीचं नाव बदलणार, कंपनीचा निर्णय !

 मोठी बातमी : शिवभक्तांनो 'संभाजी बिडी'चे नाव बदलणार!

पुणे : संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे आणि कंपनीने घेतला आहे. कंपनीने प्रसिद्धिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली.  

संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अशा पद्धतीने वापरलं जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातही संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पाहायला मिळालं.
या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे. म्हणजेच संभाजी बिडीऐवजी नवं नाव रजिस्टर केलं जाईल. जेणेकरुन हे नवीन नाव ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

आमच्या ग्राहकांची साखळीही तुटणार नाही, तसंच शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि 60 ते 70 हजार विडी कामगारांच्या प्रपंचावरही कुऱ्हाड येणार नाही, असे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.