Breaking News

श्रीरामपूर जनता कर्फ्यु ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीरामपूर जनता कर्फ्यु ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद


श्रीरामपूर प्रतिनिधी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या जनता कर्फ्यूला आज रविवारी पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी प्रचंड प्रतिसाद देत आपल्या मनात कोरोनाबद्दलची जागृती दाखवून दिली . आज शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवरील दुकाने कडकडीत बंद होती . शहर लॉकडाऊन करण्याच्या प्रश्नावर झालेल्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर आज रविवारी पहिल्या दिवशी शहरवासीयांचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही याची साशंकता होती . मात्र शहरातील जनतेने या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद दिला . फळविक्रेत्यांच्या गाड्या आणि बेकरी वाल्यांची दुकाने सकाळी अपवादात्मक रित्या सुरू होती . मात्र दिवसभर शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती . जनतेने स्वतःच्या काळजी साठी स्वतः निर्बंध लादून घेण्याचा निर्णय घेऊन पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद दिला . देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पेशंट असून जिल्ह्याबरोबरच श्रीरामपुरात ही त्यांच्या संख्येत वाढ होत आहे .
       ही वाढ रोखण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे . याकरिता नगराध्यक्षा अनुराधा आदिक व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन आठ दिवस शहर बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे . त्याला आजी-माजी आमदार वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील साथ दिली आहे . त्यामुळे सर्व पक्षीयांच्या साथीने हा आठ दिवसांचा लॉकडाऊन यशस्वी होईल असे चित्र आज निर्माण झाले आहे . कोरोणाचा आजार गरीब-श्रीमंत काही पाहत नाही . तो कोणालाही होऊ शकतो . 
       शहरातील सर्व रुग्णालय सध्या फुल्ल आहेत . त्यामुळे आपल्या घरातील कोणालाही कोरोना होऊ नये ही काळजी शहरातील प्रत्येक नागरिक घेताना दिसून येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सर्वत्र बंद पाळण्यात आला . मेडिकल स्टोर सुरू असले तरी मेडिकल असोसिएशनने देखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आपली दुकाने सुरू न ठेवता ठराविक कालावधीसाठी दुकान सुरु  ठेवून नंतर बंद करावे अशीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे . किराणा दुकानदारांनी सुद्धा ठराविक दोन-तीन तास दुकान उघडे ठेवावे नंतर बंद करावं . दूधवाले, भाजीपालावाले यांनी सकाळी आपली सेवा पुरवावी. त्यानंतर मात्र बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केले आहे . श्रीरामपूर शहरामध्ये लॉकडाऊन वरून जे हीन दर्जाचे राजकारण करण्यात आले आहे त्याबद्दल सामान्य जनतेने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . 
      हा रोग शत्रुला सुद्धा होऊ नये अशी प्रत्येकाची भावना असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी आणि बैठकीला आम्हाला बोलावले नाही म्हणून त्याला जर कुणी विरोध करणार असेल तर ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी व्यक्त केली .