Breaking News

अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

स्थायीच्या सभापतिपदी मनोज कोतकर बिनविरोध- राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार 

मुंबई/ प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर पडला आहे. अहमदनगर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. युवराज गाडे यांनी शिवसेनेतर्फे स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी अर्ज भरला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन पक्षात चर्चा झाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नगर जिल्ह्यात यापुढे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र काम करण्याची सुरुवात स्थायी समितीच्या निवडणुकीपासून झाल्याची चर्चा आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला, असेही संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी चर्चा केली होती. तसेच शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही एकमेकांशी सल्लामसलत केली होती. या सगळ्यात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत दोन्ही पक्षांना एकत्र आणले होते.